पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्यावर अ‍ॅसिड फेकल्याची घटना पुण्यातील बोपदेव घाटात येथे घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. दिनेश धुमक (वय 39 रा. बावधन) गाव असे आरोपी पतीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिनेश आणि फिर्यादी पत्नी हे दोघे मूळचे कोकणातील आहे. त्या दोघांचा प्रेम विवाह असून आरोपी फिल्टर दुरूस्तीचे काम करतो. तर फिर्यादी पत्नी घरगुती काम करते. मागील काही दिवसांपासून तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यातून दोघांमध्ये अनेक वेळा भांडण देखील झालेली आहेत.

दरम्यान, आरोपी पती दिनेश हा पत्नीला म्हणाला तू कुठं काम करतेस ते मला दाखव, असे म्हणून तो बोपदेव घाटामध्ये तिला गाडीवर घेऊन गेला. मात्र तिने कामाचे ठिकाण दाखविण्यास त्याला नकार दिला. त्यावर तिला धमकावत, मला तुझा चेहरा पाहायचा असल्याचं म्हणून तोंडावरील मास्क खाली घेण्यास सांगितलं. पत्नीने मास्क खाली घेताच आरोपी दिनेश याने बाटलीत आणलेले अ‍ॅसीड पत्नीच्या तोंडावर, अंगावर फेकले. यामध्ये पत्नीच्या डाव्या डोळ्याच्या वर आणि डाव्या दंडावर भाजले आहे. या घटनेची माहिती मिळताच, जखमी महिलेस तात्काळ रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर आरोपी दिनेशला अटक करण्यात आल्याचे कोंढवा पोलिसांनी सांगितले.