शेतकऱ्यांकडून थेट ग्राहकांना भाजीपाला

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील आडत्यांनी सोमवारपासून पुकारलेला बंद बुधवारी संध्याकाळी मागे घेतला असला, तरी बुधवारी सकाळपासूनच शेतकरी मोठय़ा प्रमाणावर भाजीपाला घेऊन बाजारात दाखल झाले होते. या शेतकऱ्यांनी थेट ग्राहकांना भाजीपाल्याची विक्री केली.

भाजीपाला व फळे बाजार समितीतून नियमनमुक्त करण्याच्या निर्णयाला विरोध करून बाजार समितीतील आडत्यांनी सोमवारपासून बेमुदत बंद केला होता. बंदच्या पाश्र्वभूमीवर बाजार समितीने शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची थेट विक्री करण्याची व्यवस्था केली होती. बाजार समिती सुरूच राहणार असून, शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीसाठी घेऊन यावा, असे आवाहनही केले होते. बंदच्या पहिल्या दिवशी काही प्रमाणात शेतीमाल विक्रीसाठी आला असला, तरी आवक कमालीची घटली होती. त्यामुळे शेतीमालाची कमतरता निर्माण होऊन किरकोळ बाजारात भाज्या व फळे महागली होती.

मंगळवारीही काही प्रमाणात शेतीमाल विक्रीसाठी आला होता. मात्र, बुधवारी सकाळपासूनच शेतकऱ्यांनी आपापल्या वाहनांमध्ये मोठय़ा प्रमाणावर भाजीपाला विक्रीसाठी आणला. त्यामुळे बाजार समितीत मोठी गर्दी झाली होती. बाजार समितीने दिलेल्या माहितीनुसार, बंदच्या पहिल्या दिवशी नेहमीच्या तुलनेत केवळ एक टक्का शेतीमाल विक्रीसाठी आला होता. बुधवारी ही टक्केवारी पन्नासवर पोहोचली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, खासदार राजू शेट्टी यांनीही सकाळी बाजार समितीत हजेरी लावून थेट शेतीमालाची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले.

दरम्यान, संध्याकाळी उशिरा मुंबईत झालेल्या चर्चेनुसार बंद मागे घेण्यात आला आहे. दिवसभर शेतकऱ्यांना शेतीमालाची विक्री करता यावी, यासाठी बाजार समितीच्या वीतीने ८० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून ३० ते ३५ वजनकाटे उपलब्ध करून दिले होते. त्याचप्रमाणे बाजार समितीतील पोलीस बंदोबस्त बुधवारीही कायम होता.