पुणे विमानतळ नूतनीकरणासाठी रोज रात्री १० ते सकाळी १० या वेळात बंद ठेवण्यात येत असून त्यामुळे विमानांच्या उड्डाणांमध्ये परस्पर झालेल्या ‘स्थलकाल’ बदलांमुळे प्रवाशांची चांगलीच गैरसोय होत आहे. काही विमान कंपन्यांनी विमानतळ बंद राहण्याच्या वेळेनुसार आपल्या विमानांच्या उड्डाणांच्या वेळा बदलल्या आहेत तर काही कंपन्यांनी पुण्याऐवजी मुंबई विमानतळावरून उड्डाणे ठेवली आहेत.
क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी पुरवलेल्या माहितीनुसार, सहा महिलांनी स्पाइसजेट कंपनीची पुणे ते कोची या विमानाची तिकिटे आरक्षित केली होती. ही तिकिटे १० फेब्रुवारीची असून त्यांचे आरक्षण दोन महिन्यांपूर्वीच करण्यात आले होते. पुणे विमानतळ खुले राहण्याच्या वेळांमधील बदलांमुळे स्पाइसजेट कंपनीने पुण्याहून होणारे विमानाचे उड्डाण रद्द करून ते उड्डाण १० फेब्रुवारीलाच पण मुंबईहून होणार असल्याचे कळवले. मुंबईहून होणारे विमानाचे उड्डाण सकाळी ७.४५ असल्यामुळे या महिलांना आदल्या दिवशीच अतिरिक्त खर्च करून मुंबईला जाणे आणि तिथे एक रात्र राहण्याचीही सोय करणे भाग आहे. यासंबंधी खर्डेकर यांनी पुणे विमानतळाशी संपर्क साधल्यावर या प्रकरणाचा विमानतळाशी काहीही संबंध नसल्याचे सांगण्यात आले. गैरसोयीविषयी स्पाइसजेट कंपनीशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याचे खर्डेकर यांनी सांगितले. अशाच प्रकारचा अनुभव इतर काही प्रवाशांनीही नोंदवला आहे.
यासंबंधी स्पाइसजेट कंपनीशी संपर्क साधला असता त्यांच्या प्रतिनिधीने सांगितले, ‘प्रवाशांना स्वखर्चाने मुंबईला येणे जमणार असल्यास त्यांना मुंबईहून उड्डाण करण्याचा पर्याय कंपनीतर्फे दिला जात आहे व प्रवासी त्यास तयार नसल्यास कंपनी तिकिटाचे संपूर्ण पैसे परत करत आहे.’