26 September 2020

News Flash

प्रादेशिक बातम्यांच्या पहिल्या प्रसारणाचे हस्तलिखित आकाशवाणी पुणे केंद्राकडे सुपूर्द

आकाशवाणी पुणे.. सदाशिव दीक्षित प्रादेशिक बातम्या देत आहे..’

आकाशवाणी पुणे केंद्राच्या पहिल्या बातमीपत्राचे हस्तलिखित चंद्रशेखर कारखानीस यांनी आशिष भटनागर आणि नितीन केळकर यांच्याकडे सुपूर्द केले.

आकाशवाणी पुणे.. सदाशिव दीक्षित प्रादेशिक बातम्या देत आहे..’ महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून आकाशवाणी पुणे केंद्रावरून १ मे १९७५ रोजी हा आवाज घुमला. या पहिल्या प्रसारणामध्ये वाचन करण्यात आलेल्या बातमीपत्राचे मूळ हस्तलिखित हा महत्त्वाचा दस्तावेज तब्बल ४४ वर्षांनी आकाशवाणी पुणे केंद्राकडे सुपूर्द करण्यात आला. बातम्यांचे हे कागद ४४ वर्षांत पिवळे पडले असून या मूळ हस्तलिखितांचे डिजिटायझेशनद्वारे जतन करण्यात येणार आहे.

आकाशवाणी पुणे केंद्रावरील प्रादेशिक बातम्यांनी १ मे रोजी ४५ व्या वर्षांत पदार्पण केले. त्या दिवसापासून आजतागायत गेली ४४ वर्षे सकाळी ७ वाजून ५ मिनिटांनी प्रादेशिक बातम्यांचे प्रसारण केले जात आहे. दिवसभरातील घडामोडींची अद्ययावत माहिती देणारे दहा मिनिटांच्या कालावधीचे हे बातमीपत्र श्रोत्यांच्या आवडीचे ठरले आहे. प्रादेशिक बातम्यांच्या वर्धापनदिनानिमित्त स्थापनेपासून वृत्त विभागात काम करणाऱ्या संपादक आणि निवेदकांचे अनौपचारिक संमेलन आयोजिण्यात आले होते.

या संमेलनात आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित झालेल्या पहिल्या बातमीपत्राचे मूळ हस्तलिखित या बातम्यांचे संपादन करणारे चंद्रशेखर कारखानीस यांनी आकाशवाणी पुणे केंद्राचे केंद्रप्रमुख आशिष भटनागर आणि केंद्राच्या वृत्त विभागाचे उपसंचालक नितीन केळकर यांच्याकडे सुपूर्द केले. कारखानीस यांच्यासह डी. के. अष्टेकर यांनी या बातम्यांचे संपादन केले होते. सदाशिव दीक्षित आणि सुधा नरवणे यांनी या बातमीपत्रातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्यांचा अनुवाद केला होता, तर सदाशिव दीक्षित यांनी या बातमीपत्राचे वाचन केले होते.

‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी आजच (१ मे १९७५) सुरू होत असलेल्या बातमीपत्राचे स्वागत केले आहे. ते म्हणतात.. असे सांगून थेट मुख्यमंत्र्यांचा आवाज श्रोत्यांना ऐकविण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा संदेशाने बातमीपत्राचा प्रारंभ झाला. सदाशिव दीक्षित प्रादेशिक बातम्या देत आहे, अशा उद्घोषणेने बातमीपत्र सुरू झाले’, अशी माहिती नितीन केळकर यांनी दिली. फुलस्केप आकाराच्या बाँड कागदावर या बातम्यांचे लेखन करण्यात आले होते. दहा मिनिटे कालावधीच्या बातमीपत्रामध्ये सुमारे बाराशे शब्दांचा समावेश असलेल्या १९ बातम्यांचे वाचन करण्यात आले होते, असेही केळकर यांनी सांगितले.

बातम्यांच्या लेखनामध्ये विरामचिन्हांचा योग्य वापर

बातम्यांच्या लेखनामध्ये स्वल्पविराम, अल्पविराम, पूर्णविराम आणि दीर्घ पूर्णविराम अशा सर्वच विरामचिन्हांचा योग्य प्रकारे वापर केला असल्याचे बातमीपत्र वाचल्यानंतर स्पष्टपणे ध्यानात येते. शब्दांच्या वरच्या बाजूला स्वल्पविराम तर, शब्दांच्या खालच्या बाजूला अर्धविराम देण्यात आला आहे. पूर्णविराम म्हणून केवळ टिंब देण्यापेक्षा शब्दांच्या आकारापेक्षा मोठी ठळकपणे दिसेल अशी तिरपी रेष मारण्यात आली आहे, तर आघात ठेवून शब्दोच्चारणासाठी पूर्णविरामावर दोन आडव्या रेषा मारून दीर्घ पूर्णविराम देण्यात आला आहे, असे वैशिष्टय़ नितीन केळकर यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2019 2:15 am

Web Title: pune akashwani first news bulletin
Next Stories
1 पुण्यात संगणक अभियंत्याला बेदम मारहाण करत तिघांनी लुटले
2 ‘आरटीई’ प्रवेशांसाठी आज अखेरचा दिवस
3 औंध-बाणेर-बालेवाडीत ‘स्मार्ट रोड’
Just Now!
X