जन्मदाते वृद्ध आई-वडील त्रास देतात, वेडसरपणा करतात त्यांच्यामुळे घरात सतत भांडण होतात असं कारण देत रिक्षा चालक असलेल्या दोन मुलांनी वृद्ध आईवडिलांना आळंदीत बेवारस सोडल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हृदय हेलावून टाकणारा हा सर्व प्रकार आळंदीच्या पोलीस ठाण्यासमोर घडला असून स्थानिक नागरिकांच्या दबावामुळे मुलं आई वडिलांना पुन्हा त्यांच्या राहत्या घरी घेऊन गेले आहेत. मात्र, ते पुन्हा असं करणार नाहीत असं ठामपणे सांगणं चुकीचं ठरेल.

दोन्ही भाऊ हे त्यांच्या वृद्ध आई वडिलांना घेऊन आळंदीत आले होते. आई वडिलांना बेवारस सोडायचं होतं, मात्र स्थानिक नागरिकांच्या हे सर्व लक्ष्यात येताच मुलांना चांगलं खडसावलं. पुन्हा असं न करण्याची तंबी स्थानिकांनी दोन्ही मुलांना दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  हे दोघे भाऊ रिक्षा चालक असून त्यावरच त्यांचा संसार चालतो. घरात सतत भांडण होतात, आई वडिलांचा त्रास आहे, ते वेडसरपणा करतात. त्यामुळं आम्हाला त्यांना सांभाळायचं नाही असं मुलाने सांगितलं. ते आळंदीत बेवारस सोडण्यासाठी आले होते.

तर, वृद्ध आई वडिलांच्या तोंडून एक शब्द ही फुटत नव्हता. आम्हाला आळंदीत राहा असे म्हणून दोन्ही मुलांनी मांजरीगाव येथून आणले असल्याचं त्या वृद्ध आईने सांगितले. तेथील स्थानिक नागरिकांनी जाब विचारत चढ्या आवाजात बोलत असताना वृद्ध आईने पुढे येऊन हात जोडत मुलाला काही न बोलण्याची विनवणी केली. खरंतर हे सर्व खेदजनक असून हृदय हेलावून टाकणारी घटना म्हणावी लागेल. काही मिनिटांच्या नाट्यानंतर स्थानिकांच्या दबवानंतर रिक्षा चालक दोन्ही मुलांनी वृद्ध आई वडिलांना रिक्षात बसवून त्यांच्या मूळ गावी घेऊन गेले आहेत. परंतु, दोन्ही मुले असं पुन्हा करणार नाहीत याची शक्यता धूसर आहे.