पुणे : शहरात करोनारुग्णांच्या संख्येत वाढ नसतानाही दुपारी चार वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यासंदर्भात देण्यात आलेल्या आदेशामुळे व्यापारावर प्रतिकूल परिणाम होत आहे. रोगापेक्षाही इलाज भयंकर अशी व्यापाऱ्यांची भावना झाली आहे. त्यामुळे दुकानदारांना शनिवार आणि रविवारी व्यवसायास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी पुणे व्यापारी महासंघाने राज्य शासनाकडे केली आहे.

या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना निवेदन पाठविण्यात आले असल्याचे पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका आणि सचिव महेंद्र पितळीया यांनी सांगितले.

रांका म्हणाले, ५ एप्रिलपासून शनिवार व रविवार या दोन्ही दिवशी दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सध्याच्या आदेशानुसार आठवडय़ामधील पाच दिवस दुकानांना दुपारी चार वाजेपर्यंत परवानगी दिली असली, तरी केवळ दोन दिवसच व्यवसायाची संधी मिळत आहे. सकाळी अकरा वाजेपर्यंत अत्यावशक वस्तू वगळता कोणीही इतर वस्तू खरेदीसाठी बाहेर पडत नाही. दुकाने सकाळी दहा वाजता उघडली जातात. त्यामुळे फक्त सहा तास व्यवसाय करण्यास मिळतात. पूर्वी रात्री नऊ वाजेपर्यंत दुकाने उघडी असावयाची. सोमवार ते शुक्रवार या दिवसांचे ३० तास कमी झाले आहेत. नोकरदारांना सायंकाळी पाच वाजण्यापूर्वी खरेदीची संधी मिळत नाही. चार वाजता दुकाने बंद झाल्यामुळे आमच्या व्यवसायामध्ये फार मोठे नुकसान होत आहे.

अत्यावश्यक वस्तूंची दुकाने वगळून शहरामधील सर्व दुकाने आठवडय़ातील सातही दिवस सकाळी अकरा ते रात्री आठ या वेळात उघडी ठेवून व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी.

– फत्तेचंद रांका, अध्यक्ष, पुणे व्यापारी महासंघ