पुण्यातल्या आंबिल ओढा परिसरात अतिक्रमण हटवण्यासाठी होणाऱ्या कारवाईला स्थानिकांकडून प्रचंड विरोध होत आहे. ९ जुलैपर्यंत कोणतंही अतिक्रमण हटवण्यात येऊ नये असा हायकोर्टाचा आदेश असला तरीही ही कारवाई सुरुच असल्याने नागरिकांमध्ये असंतोष आहे. उपस्थित कारवाई करणाऱ्यांना वारंवार या आदेशाची आठवण करुन देत असले तरी कारवाई थांबवली जात नाही.

करोना पार्श्वभूमीचा विचार करता कोणतंही अतिक्रमण पाडलं जाणार नाही अशा प्रकारचे आदेश हायकोर्टाकडून देण्यात आले आहेत. १६ एप्रिल २०२१ रोजी हे आदेश पारित करण्यात आले होते. त्यानंतर या आदेशांची अंमलबजावणी ९ जुलैपर्यंत करण्यात यावी असाही आदेश हायकोर्टाने काढला होता. या आदेशाची आठवण स्थानिक वारंवार करुन देत असतानाही ही कारवाई थांबवण्यात आलेली नाही.

जाणून घ्या काय आहे प्रकरणः पुण्यात पोलीस आणि स्थानिकांमध्ये तुफान राडा; अंगावर रॉकेल ओतून नागरिकांकडून आत्मदहनाचा प्रयत्न

या कारवाईदरम्यान स्थानिकांनी हायकोर्टाचा अवमान करु नका अशा घोषणाही वारंवार दिल्या मात्र तरीही कारवाई सुरुच राहिली.

या कारवाईबद्दल पुणे महापालिकेचे उपायुक्त अविनाश सपकाळ सांगतात की, अंबिल ओढा येथील नाल्या लगत असलेल्या 136 घरांना प्रशासनाकडून नोटीस पाठविण्यात आली होती. सर्व नियम पाळून कारवाई करण्यात येत असून या सर्व बाधित कुटुंबाची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या नागरिकांना याआधीही अनेकदा नोटीस पाठवण्यात आली होती. वर्तमानपत्रांमधूनही नोटिसा देण्यात आल्या होत्या, असंही महापालिकेकडून सांगण्यात येत आहे.