पश्चिम भारतातील सर्वात मोठे वाहन उद्योग प्रदर्शन असा लौकिक असलेल्या ‘पुणे ऑटो एक्स्पो’मध्ये हार्ले डेव्हिडसन आणि अन्य लोकप्रिय सुपर बाइक्स हे विशेष आकर्षण असेल. आधुनिक बाइक्ससाठी या प्रदर्शनामध्ये एक स्वतंत्र विभाग ठेवण्यात आला आहे.
बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर गुरुवारपासून (१८ फेब्रुवारी) चार दिवस भरविण्यात येणाऱ्या पुणे ऑटो एक्स्पो प्रदर्शनाचे उद्घाटन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते गुरुवारी सकाळी अकरा वाजता होणार आहे. २१ फेब्रुवारीपर्यंत दररोज सकाळी अकरा ते रात्री आठ या वेळात हे प्रदर्शन खुले राहणार आहे. राज्य परिवहन सेवा आणि पीएमपीएमएलमधील प्रत्येकी दोन बसचालकांना सुरक्षित वाहन चालविल्याबद्दल ‘बेस्ट ड्रायव्हर्स’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. सर्वसामान्य माणसांमध्ये इंधनबचत, पर्यावरण संरक्षण, खासगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहनांचा अधिकाधिक वापर या विषयांवर जनजागृती केली जाणार आहे. ऑटोमोबाइल क्षेत्रातील प्रगती, वाहनांची स्वयंदेखभाल, वाहतुकीचे नियम, काळजीपूर्वक वाहन चालविणे, वाहन खरेदीसंबंधीची कर्जव्यवस्था आणि विमा या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे, अशी माहिती संयोजक पी. एन. आर. राजन यांनी दिली.
संपूर्ण देशातील उत्पादकांचे प्रतिनिधी, विक्रेते, व्यापारी, सव्र्हिस इंजिनिअर, मेकॅनिक्स, गॅरेजमालक आणि संबंधित व्यावसायिक या प्रदर्शनाच्या निमित्ताने एकत्र येणार आहेत. प्रवासी वाहने, दुचाकी स्वयंचलित वाहने, सुटे भाग, गॅरेजसाठी लागणारी आयुधे आणि दुरुस्ती यंत्रणा अशी विविध ७५ दालने या प्रदर्शनामध्ये असतील. बाहा, सुप्रा, गोकार्ट आणि इफी या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जागतिक बक्षिसे मिळविलेले आणि सहभागी झालेले विद्यार्थी त्यांनी बनविलेली वाहने आणि ऑटोमोबाइलमधील नवीन संशोधने मांडणार आहेत. यंदा प्रदर्शनामध्ये प्रथमच अभियांत्रिकी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘इंडस्ट्रियल इन्स्टिटय़ूशन्स’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.