राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसने अध्यक्षपदाबाबत अजूनही निर्णय घेतलेला नाही. पक्षाला नवीन अध्यक्षाची निवड करायची आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील एका २८ वर्षीय इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरने काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. गजानंद होसाळे हा तरुण काँग्रेस अध्यक्षपदासाठी मंगळवारी पुणे शहर अध्यक्ष रमेश बागवे यांच्याकडे आपला अर्ज पाठवणार आहे.

पेशाने इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर असलेला गजानंद पुण्यातील एका कंपनीत मॅनेजर आहे. काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या निर्णयावर राहुल गांधी ठाम आहेत. त्यांच्याजागी कोणाची निवड करायची यावर पक्षामध्ये संभ्रम आहे. या परिस्थितीत अध्यक्षपदासाठी अर्ज करण्याची माझी इच्छा आहे असे होसाळेने सांगितले.

काँग्रेसचे पुनरुज्जीवन ही सध्याची देशाची गरज असून त्यासाठी तरुण नेतृत्वाची गरज आहे. पक्षाला तरुण नेतृत्वाची गरज आहे असे स्वत: राहुल गांधी यांनी म्हटले आहे असे गजानंद होसाळेने सांगितले. सध्या पक्षाला अध्यक्ष नसल्यामुळे अनेक कार्यकर्ते पक्षापासून दुरावत चालले आहेत. त्यामुळे एकूणच पक्षाच्या कामगिरीवर परिणाम होत आहे असे होसाळे म्हणाला.

राजकारणात काही अनुभव आहे का ? किंवा कुठल्या सामाजिक संघटनेबरोबर काम केले आहे का? या प्रश्नावर गजानंदने नाही असे उत्तर दिले. होसाळे काँग्रेस पक्षाचा प्राथमिक सदस्यही नाहीय. मंगळवारी काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज करण्याआधी पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व मिळवण्याची प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचे गजानंदने सांगितले.