गेल्या वर्षभरात वैद्यकीय व्यवस्थेचा विस्तार

पुणे : करोना संसर्गाचा सर्वाधिक फटका बसलेल्या पुण्यात आता देशात सर्वाधिक खाटा आणि कृत्रिम श्वसन यंत्रणा निर्माण झाली आहे. पुणे, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भाग मिळून ३० हजारहून अधिक खाटा निर्माण झाल्या असून, त्यापैकी सर्वाधिक खाटा खासगी रुग्णालयात उपलब्ध आहेत.

गेल्या वर्षी करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला त्या वेळी पुणे जिल्ह्यात एकूण ४ हजार खाटा उपलब्ध होत्या. आता वर्षभरात त्यात वाढ करून ३० हजार ५८ खाटा उपलब्ध झाल्या आहेत. त्यात प्राणवायूची सुविधा असलेल्या ११ हजार ६० खाटा, अतिदक्षता विभागातील जवळपास २ हजार ९०० खाटा, सुमारे १५०० कृत्रिम श्वसन यंत्रणा यांचा समावेश आहे. वैद्यकीय व्यवस्थेचा विस्तार करण्यात आल्याने आता मुंबई, दिल्लीपेक्षा पुण्यातील वैद्यकीय व्यवस्थेची जास्त क्षमता आहे.

पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड रिस्पॉन्सचे प्रमुख समन्वयक सुधीर मेहता म्हणाले, की समाज म्हणून आपण पुढे यायला हवे. आपण जिथे काही करू शकतो त्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, या दृष्टीने गेल्या वर्षभरात वैद्यकीय व्यवस्थेच्या विस्तारासाठी प्रयत्न झाले. पुण्यात मोठ्या प्रमाणात वैद्यकीय व्यवस्थेचा विस्तार झाला आहे.वाढलेल्या कृत्रिम श्वसन यंत्रणांपैकी ७०० कृत्रिम श्वसन यंत्रणा पीपीसीआरने उपलब्ध करून दिल्या आहेत. खासगी रुग्णांलयांमध्ये सर्वाधिक खाटा निर्माण झाल्या आहेत. अनेक रुग्णालयांचे करोना रुग्णालयांमध्ये रूपांतर झाले. येत्या काळात तिसऱ्या, चौथ्या लाटेचे अंदाज व्यक्त केले जात आहेत. त्यामुळे अजूनही वैद्यकीय व्यवस्था सक्षम आहे असे नाही. त्यामुळे परिस्थितीचा अंदाज घेऊन प्राणवायू, कृत्रिम श्वसन यंत्रणा, खाटा राखीव ठेवाव्या लागतील.

उपलब्ध असलेल्या वैद्यकीय व्यवस्थांमध्ये आणखी २० टक्के  वाढ करावी लागेल. वाढलेल्या जागांमध्ये शासकीय रुग्णालयांतील जागा २० टक्के पेक्षा कमी आहेत. त्यामुळे गरीब घटकांना उपचार परवडण्यासाठी शासकीय रुग्णालयांची क्षमता वाढवायला हवी. खासगी रुग्णालयांना मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत असल्याने सरकारने खासगी रुग्णालयांतील दरांबाबतचे निर्बंध थोडे सैल करायला हवेत. महापालिकेने डॅशबोर्ड अधिक चांगला करून तो ‘रिअल टाइम’ करायला हवा. रुग्णांना जागा कुठे उपलब्ध आहे हे कळत नसल्याने त्यात तातडीने बदल करणे आवश्यक आहे. रुग्णालयांना लागणाऱ्या प्राणवायूचे मूल्यमापन करून गरजेनुसार प्राणवायूचा पुरवठा व्हायला हवा. त्यासाठी प्राणवायूची निर्मिती व्हायला हवी. भविष्याचा विचार करून सूक्ष्म नियोजनाची गरज आहे. – डॉ. अविनाश भोंडवे, माजी अध्यक्ष, आयएमए महाराष्ट्र