पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या चारही धरणात मागील काही दिवसापासून संततधार पाऊस सुरू असल्याने धरणे शंभर टक्के भरले आहेत. या पार्श्वभूमीवर खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात मोठया प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. तर याच मुठा पात्रातील भिडे पुलावर दोघे मित्र आले. त्या दोघांमध्ये पैज लागली आणि दोघे पाण्यात पोहण्यास उतरले. पण यामध्ये एक जण वाहून गेल्याची घटना घडली आहे.

प्रकाशसिंह श्रीभवान बोहरा वय २० असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे. तर शर्यत लावलेला असिभ अशोक उफिल वय १८ याला डेक्कन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास नारायण पेठेत एका हॉटेलमध्ये काम करणारे प्रकाशसिंह बोहरा आणि असिभ उफिल हे भिडे पुलाच्या तिथे आले. त्यावेळी त्यांच्यात पोहण्यावरून पैज लागली आणि दोघांनी पाण्यात उडी मारली. त्या दोघांपैकी असिभ हा पोहत किनाऱ्यावर आला. तर प्रकाशसिंह पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली असून प्रकाशसिंहचा अग्नीशमन विभागामार्फत नदी पात्रात शोध घेतला जात असल्याचे सांगण्यात आले.