• भाजप शहराध्यक्षांची टीका
  • पूर्वाश्रमीचे गुरूशिष्य आमनेसामने

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप हे पूर्वाश्रमीचे गुरू-शिष्य आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध भाजप या रंगलेल्या सामन्यात ते आमने-सामने आले आहेत. अजितदादांकडून सातत्याने होणाऱ्या टीकेला आतापर्यंत प्रत्युत्तर न देणाऱ्या लक्ष्मण जगताप यांनी या वेळी मात्र तोंड उघडले आहे. अजित पवार ज्योतिषांच्या नादाला लागले आहेत, त्यामुळे ते कुंडल्या बाहेर काढण्याची भाषा करू लागले आहेत. मात्र, ‘ब्लॅकमेिलग’चा हेतू ठेवून त्यांनी दिलेल्या इशाऱ्यांना आणि धमक्यांना कोणी भीक घालत नाही, असे जगतापांनी म्हटले आहे.

भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी राष्ट्रवादीच्या नगरसेवकपदाचा राजीनामा दिला, त्या दिवशी सायंकाळी अजित पवार चिंचवडला आले होते. पत्रकारांशी बोलताना त्यांनी लांडगे व जगताप यांना उद्देशून ‘जे पक्ष सोडून चाललेत, त्यांच्या कुंडल्या बाहेर काढू’ असे सूचक विधान केले होते. त्यास जगताप यांनी गुरुवारी प्रत्युत्तर दिले.

जगताप म्हणाले, शरद पवार नेहमी पुरोगामी भूमिका घेत असतात, मात्र अजित पवार ज्योतिषांच्या नादाला लागले आहेत, त्यामुळेच ते कुंडल्या काढण्याची भाषा करू लागले आहेत. त्यांची भाषा ‘ब्लॅकमेिलग’ करणारी आहे, त्यांना कोणीही भीक घालत नाही. अशाप्रकारे खोटय़ा कुंडल्या काढण्याची भाषा करणाऱ्यांना आम्ही तरी भीत नाही. त्यांनी कुंडल्या काढाव्यात, आम्ही मात्र कर्माचा सिद्धान्त मांडू, असे जगताप यांनी म्हटले आहे. माझे वडील वारले तेव्हा हजारो नागरिक भेटून सांत्वन करून गेले. विरोधकांनीही जगताप कुटुंबीयांना आधार दिला.

मात्र, याच काळात अजित पवार यांनी आपल्यावर टीका केली. दु:खद घटनेवेळी राजकारण करण्याची आपली संस्कृती नाही, याकडे जगताप यांनी लक्ष वेधले.