भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांची टीका

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर आगामी महापालिका निवडणुकीतही पराभव होण्याच्या भीतीने हतबल झाल्यामुळेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे बेजबाबदार वक्तव्ये करीत असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी मंगळवारी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील गळती थांबविणे पवार यांच्या आवाक्याबाहेर असून त्यांच्या नगरसेवकांचाही पक्षावर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे पवार यांच्या भूलथापांना पुणेकर फसणार नाहीत, असेही गोगावले यांनी सांगितले.

आगामी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मेळाव्याचे आयोजन केले होते. मेळाव्यात बोलताना पवार यांनी भारतीय जनता पक्षाचे अपयश लोकांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन पदाधिकाऱ्यांना करत राज्य शासनावर कडाडून टीका केली होती. शहराचे प्रश्न सोडविण्यासाठी बैठका झाल्या पण प्रश्न सुटले नाहीत. सरकारची धरसोड वृत्तीच याला कारणीभूत असून शहराचा कायापालट करण्याची भाषा बोलणाऱ्यांनी पुण्यासाठी काय केले, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता. शहराचे प्रलंबित प्रश्न केंद्र आणि राज्य सरकारला सोडविता आलेले नाहीत. पाण्याचे नियोजनही भाजपला करता आलेले नाही, अशीही टीका पवार यांनी केली होती. त्यांनी केलेल्या या टीकेला गोगावले यांनी प्रत्युत्तर दिले.

राष्ट्रवादीची वाटचाल ही राष्ट्रीय, प्रादेशिक आणि विभागीय अशा पद्धतीने सुरु झाली आहे. पुण्यातूनच तिकिटे वाटणार हे पवार यांचे म्हणणे त्याला पूरक आहे. राष्ट्रवादी पक्ष हा स्थानिक झाला असून पक्षातील गळती थांबविणे पवारांच्या आवाक्याबाहेरच आहे. सिंचनात ७६ हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा ठपका असणारी व्यक्ती पाण्याचे नियोजन केल्याचा दावा करते हाच मोठा विनोद आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकाळात कालवा समितीची बैठक एकदाच होत होती. भाजपने खरीप आणि रब्बी हंगामानुसार दोन वेळा बैठक घेतली आहे, असे गोगावले यांनी सांगितले.

ते म्हणाले की, राष्ट्रवादीने बांधलेल्या उड्डाणपुलांचे नियोजनच चुकले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असून त्याला राष्ट्रवादी जबाबदार आहे. वाहतूक कोंडीमुळेच पवार यांना रिक्षातून प्रवास करण्याची वेळ आली, हे ते सोईस्करपणे विसरले आहेत. महापालिकेत सत्ता असतानाही पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शहरासाठी कोणती विकास योजना आणली याचे उत्तरही त्यांनी द्यावे. त्यामुळे पराभूत मानसिकतेतूनच अशी बेजबाबदार विधाने करून पवार पुणेकरांची दिशाभूल करीत आहेत. मात्र,आगामी निवडणुकीत पुणेकर त्यांना त्यांची जागा दाखवून देतील, असेही ते म्हणाले.