पुण्यातील ससून रुग्णालयात भाजपाच्या महिला नगरसेविकेने डॉक्टर महिलेस मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यामध्ये भाजपाच्या नगरसेविका आरती कोंढरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्नेहल अशोक खंडागळे (वय २६, रा. बी जे मेडिकल होस्टेल, पुणे) असे मारहाण झालेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, स्नेहल खंडागळे या वार्ड न. ४३ मध्ये रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास एका रुग्णावर उपचार करत होत्या. त्याच दरम्यान आरती कोंढरे आतमध्ये आल्या आणि कॉटवर असलेल्या एका रुग्णाविषयी विचारणा केली आणि येथे कोण डॉक्टर आहेत या रुग्णाला कोण पाहत आहे, अशी आरडाओरड करत विचारणा केली. त्यांनी खंडागळे यांना रुग्ण गंभीर असून त्याच्यावर लवकर उपचार करा, असे म्हटले. संबंधित रुग्णावर प्राथमिक उपचार करण्यात आले असून त्यांच्या डोक्यावरील जखमेची मलमपट्टी केल्याचे खंडागळे यांनी सांगितले. तरीही समाधान न झालेल्या कोंढरे यांनी आरडाओरड सुरूच ठेवली होती.

कोंढरे यांनी खंडागळे यांना वरिष्ठांकडे तक्रार करण्याचा दम दिला. खंडागळे यांनी आपण सध्या दुसऱ्या गंभीर रुग्णाची तपासणी करत असल्याचे सांगितले. त्याचबरोबर खंडागळे यांनी कोंढरे यांना फोटो काढण्यास व शुटिंग करण्यास रोखले. त्यावेळी कोंढरे यांनी खंडागळे यांना कानिशलात लगावत शिवीगाळ केली.

याप्रकरणी कोंढरे यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.