फरासखाना, विश्रामबाग पोलीस ठाण्यांच्या पार्किंगमध्ये बॉम्बस्फोट झालेली मोटारसायकल दोन संशयितांनी तेथे उभी केल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रकरणाद्वारे स्पष्ट झाले असून, हे दोघे चार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये दिसले आहेत. या दोघांनी बाजीराव रस्त्याने येऊन फरासखान्याच्या पार्किंगमध्ये मोटारसायकल लावल्याचे या चित्रीकरणाद्वारे स्पष्ट झाले आहे. या संशयितांचा शोध तपास यंत्रणांनी युद्धपातळीवर सुरू केला आहे.
पुण्यातील अत्यंत गजबजलेल्या दगडूशेठ मंदिराच्या पाठीमागे असलेल्या फरासखाना आणि विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या पार्किंग मध्ये लावलेल्या दुचाकीचा १० जुलै रोजी कमी तीव्रतेचा स्फोट झाला. या स्फोटामध्ये एक पोलीस कर्मचाऱ्यासह पाच जण किरकोळ जखमी झाले होते. या स्फोटात वापरण्यात आलेली दुचाकी ही साताऱ्यातील पोलीस कर्मचारी दादासाहेब राजगे या कर्मचाऱ्याची असल्याचे समोर आले होते. या गुन्ह्य़ाचा तपास एटीएसची दहा पथके करत असून गुन्हे शाखेतील काही अधिकारी त्यांना मदत करीत आहे. बॉम्बस्फोटानंतर तपास यंत्रणांकडून परिसरातील बाजीराव, शिवाजी, केळकर रस्त्यावरील अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रीकरण गोळा केले होते. पोलिसांचे एक पथक सीसीटीव्ही पाहण्याचे काम सतत करीत आहे. या गुन्ह्य़ाचा तपास योग्य दिशने सुरू असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
स्फोटाच्या दुसऱ्याच दिवशी सीसीटीव्ही चित्रीकरणात एक तरुण मोटार सायकल लावताना दिसत होता. मात्र, आतापर्यंत तपासलेल्या सीसीटीव्ही चित्रीकरणातून चार सीसीटीव्हीमध्ये संशयित कैद झाले आहेत. मोटारसायकल घेऊन येणारे दोघे असून ते बाजीराव रस्त्यावरून पुढे अप्पा बळवंत चौकातून फरासखाना पोलीस ठाण्याकडे आले. त्यानंतर बुधवार चौकात वळून त्यातील एकाने गुरुवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास दुचाकी फरासखानाच्या पार्किंगमध्ये लावली. त्या वेळी समोरील स्नॅक्स सेंटर बंद असल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरणात दिसत आहे. या दोन संशियताचा तपास यंत्रणांकडून कसून शोध घेतला जात आहे.