पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्याच्या पार्कींगमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पाच तास अगोदर एका तरुणाने तिथे ती मोटारसायकल आणून लावल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरणात दिसले आहे. मात्र, त्या तरुणाचा फोटो अस्पष्ट दिसत असल्यामुळे जवळपासच्या इतर सीसीटीव्हींमधील चित्रीकरण जमा करण्यात आले आहे. त्याद्वारे त्या तरुणाचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, हा स्फोट दहशतवादी हल्ला असल्याचे सकृतदर्शनी दिसत असल्याचे दहशतवादविरोधी पथकाकडून शुक्रवारी स्पष्ट करण्यात आले.
दगडूशेठ मंदिराच्या पाठीमागे असलेल्या फरासखाना व विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या पार्कींगमध्ये  लावलेल्या दुचाकीचा गुरुवारी दुपारी दोन वाजून पाच मिनिटांनी कमी तीव्रतेचा स्फोट झाला. या स्फोटामध्ये पाच जण किरकोळ जखमी झाले होते. या स्फोटासाठी साताऱ्यातील एका पोलीस कर्मचारी दादासाहेब राजगे यांची चोरी झालेल्या दुचाकीचा वापर केल्याचे तपासात समोर आले होते. या प्रकरणी एटीएसकडून राजगे यांची चौकशी करण्यात आली आहे. या स्फोटाचा तपास एटीएसकडे देण्यात आल्यानंतर परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे ताब्यात घेऊन त्याची तपासणी करण्यात येत आहे. जप्त केलेल्या एका सीसीटीव्ही चित्रीकरणात पाच तास आधी ट्राऊजर, शर्ट आणि स्पोर्टस् शूज घातलेला एक तरुण फरासखाना पोलीस ठाण्याच्या पार्कींगमध्ये दुचाकी लावून जाताना दिसत आहे. मात्र, या तरुणाचा फोटो अस्पष्ट दिसत आहे. त्यामुळे पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही चित्रीकरण गोळा केले असून त्या वेळेचे चित्रीकरण तपासण्यात येत आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
एटीएसची तपासासाठी दहा पथके
एटीएसकडून हा स्फोट दहशतवादी हल्ल्याचा भाग असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या गुन्ह्य़ाच्या तपासाची सर्व कागदपत्रे एटीएसने ताब्यात घेतली असून तपासासाठी दहा पथके तयार केली. घटनास्थळी मिळालेले पुरावे न्याय वैद्यक प्रयोगशाळेत तपासासाठी पाठविण्यात आले असून त्यांच्याकडून लवकरच अहवाल अपेक्षित आहे. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू असल्याचे एटीएसकडून सांगण्यात आले. दरम्यान, फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात पार्कींगची वाहने लावण्यास यापुढे बंदी घालण्यात आली आहे, असे पोलीस सहआयुक्त संजयकुमार यांनी सांगितले.
सीसीटीव्ही बसविण्याची घोषणा अजूनही हवेतच
जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर पुण्यात सीसीटीव्ही बसवण्यिाची घोषणा करण्यात आली होती. त्यासाठी राज्य शासनाकडून रक्कमही मंजूर झाली. मात्र, जंगली महाराज रस्त्यावरील बॉम्बस्फोटाला दोन वर्षे झाली तरी अद्यापही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले नाहीत. आता फरासखाना पोलीस ठाण्यात बॉम्बस्फोट झाल्यानंतर पुन्हा सीसीटीव्हीचा प्रश्न चर्चेला आला आहे. जंगली महाराज रस्त्यावर १ ऑगस्ट २०१२ रोजी साखळी बॉम्बस्फोट झाल्यानंतर या रस्त्यावर सीसीटीव्ही नसल्याचे आढळून आले. ज्या दुकानाचे सीसीटीव्ही चित्रीकरण मिळाले, ते चित्रीकरण अगदी अस्पष्ट असल्यामुळे आरोपींचा माग काढण्यात अडचणी आल्या. त्यानंतर २० ऑगस्ट २०१३ रोजी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यावेळी सुद्धा आरोपींचे अस्पष्ट सीसीटीव्ही चित्रीकरण असल्यामुळे त्यांची ओळख पटवता आलेली नाही. शहरात साधारण १२८५ सीसीटीव्ही बसविण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली असून ते काम जुलैपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, अद्यापही हे काम पूर्ण झालेले नाही.
मोटारसायकलमध्ये बदल केले
बॉम्बस्फोटासाठी वापरण्यात आलेल्या चोरीच्या मोटारसायकलमध्ये पुण्यात आणल्यानंतर बदल करण्यात आल्याचे उघड झाले आहे. या मोटारसायकलमधील बारा व्होल्टच्या बॅटरीला आणखी नऊ व्होल्टच्या बॅटरीची जोड देण्यात आली होती. हे काम पुण्यातच करण्यात आले. अशा पद्धतीची बॅटरी विकणारी पुण्यात मोजकीच दुकाने आहेत. त्यांच्याकडे पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. साताऱ्यातून ही मोटारसायकल पुण्यात रस्त्याने आणल्याची शक्यता गृहीत धरून रस्त्यावरच्या सर्व टोलनाक्यांचे सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेण्याचे काम सुरू केले आहे.