पुणे महापालिकेची फेब्रुवारी २०१७ मध्ये होत असलेली सार्वत्रिक निवडणूक लक्षात घेऊन तयार करण्यात आलेले तब्बल ७० घोषणांचे अंदाजपत्रक स्थायी समितीमार्फत सोमवारी मुख्य सभेला सादर करण्यात आले. आगामी आर्थिक वर्षांचे (सन २०१६-१७) हे अंदाजपत्रक पाच हजार ७४८ कोटींचे असून महापालिका आयुक्तांनी तयार केलेल्या अंदाजपत्रकात स्थायी समितीने तब्बल ५४९ कोटींची वाढ केली आहे. ‘निवडणूक वर्षां’मुळे या अंदाजपत्रकात पुणेकरांसाठी लोकप्रिय घोषणांचा भडीमार करण्यात आला आहे.
स्थायी समितीच्या अध्यक्ष अश्विनी कदम यांनी सोमवारी त्यांचे अंदाजपत्रक सादर करताना त्यातील ठळक बाबींची माहिती सभेत दिली. औंध, बाणेर, बालेवाडी या भागांचा स्मार्ट सिटी योजनेत विकास केला जाणार असला तरी उर्वरित शहराचाही विकास आम्ही  अतिशय चांगल्या पद्धतीने करून दाखवणार आहोत आणि त्यासाठी विविध योजनांचा समावेश अंदाजपत्रकात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. वाहतूक सुधारणा, महिला सक्षमीकरण, महिलांना स्वयंरोजगार, मराठी भवनाची बांधणी, पालखी मार्गात सुधारणा, तळजाई येथे विविध प्रकल्प, संपूर्ण शहर वायफाय, ज्येष्ठांना निवृत्तिवेतन आदी अनेक योजनांची घोषणा कदम यांनी यावेळी केली.
महापालिका आयुक्तांनी तयार केलेल्या अंदाजपत्रकात स्थायी समितीने ५४९ कोटींची वाढ केली आहे. त्यात मुख्यत: कर्जाच्या माध्यमातून २०० कोटींचे उत्पन्न वाढवण्यात आले असून स्थानिक संस्था करामध्ये १०० कोटींचे, सर्वसाधारण करामध्ये २५० कोटींचे, पाणीपट्टीमध्ये ५६ कोटींचे तसेच बांधकाम विकास शुल्कात १०० कोटींचे वाढीव उत्पन्न अपेक्षिण्यात आले आहे.
अशा आहेत लोकप्रिय घोषणा
स्थायी समितीच्या अंदाजपत्रकात अनेकविध घोषणा करण्यात आल्या आहेत. पीएमपीसाठी महापालिका १०० गाडय़ा खरेदी करून देणार असून पालिकेने खरेदी करून दिलेल्या या गाडय़ा फक्त पुणे महापालिका हद्दीतच चालवल्या जातील, शहरातील वाहतूक योग्यरीत्या नियंत्रित करण्यासाठी जीपीआरएस ट्रॅफिक मॉनिटिरग सिस्टिम बसवली जाईल, विविध चौकांचा विकास केला जाईल या घोषणांसह डेंगळे पुलाला समांतर पूल (तरतूद १२ कोटी), मेट्रो प्रकल्पाला चालना (तरतूद ६७ कोटी), रस्त्यांचे काँक्रिटीकरण, विनाअडथळा पदपथांची निर्मिती, आळंदी ते पंढरपूर पालखी मार्ग हरित करणे (तरतूद २० लाख) अशा घोषणा वाहतूक सुधारणेच्या दृष्टीने करण्यात आल्या आहेत.
महिला सक्षमीकरणासाठीही अंदाजपत्रकात अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. शहरात व्यापक स्तरावर स्वच्छतागृह उभारणे, महिलांसाठी विविध उपक्रम राबवणे, निर्भया सुरक्षा पथकाची निर्मिती, प्रत्येक प्रभागातील नगरसेविकेला महिला सबलीकरण कार्यक्रम राबवण्यासाठीच्या योजना (तरतूद १५ कोटी), प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात सॅनिटरी नॅपकीन डिस्पोज मशीन बसवणे आदी योजनांचा त्यात समावेश आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्रांची उभारणी, संतसृष्टी शिल्प, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जीवनचरित्रावर शिल्पकृती, मराठी भवनाचे बांधकाम, शहरातील काही भाग ग्रीन कॉरिडॉर म्हणून विकसित करणे (तरतूद एक कोटी), वारजे येथे क्रीडा संकुलाची उभारणी, शहरात काही ठिकाणी वॉकिंग प्लाझा, फूडप्लाझा वगैरे सुविधा असलेल्या आकर्षक सार्वजनिक जागांची निर्मिती, महापालिका इमारतीवर पर्जन्यजल पुनर्भरण प्रकल्प (तरतूद पावणेदोन कोटी), फेरीवाल्यांसाठी बाजारांची बांधणी, सिंहगडावर तानाजी मालुसरे यांचे शिल्प (तरतूद एक कोटी), भिडे वाडय़ाचे जतन (तरतूद एक कोटी), प्रमुख रस्त्यांवर स्वागत कमानी (तरतूद दोन कोटी), सिंहगड रस्त्यावर सांस्कृतिक केंद्र व कलामंदिराची उभारणी (तरतूद सव्वासात कोटी), पर्वतीवर पेशवाई सृष्टी उभारणे, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह (तरतूद दोन कोटी) आदी अनेक योजनांची घोषणा अंदाजपत्रकात करण्यात आली आहे.
शहरात ई वेस्ट संकलित करण्यासाठी केंद्र उभारणे, आधुनिक यंत्रणेद्वारे रस्ते स्वच्छता, पालिका उद्यानांमध्ये ओपन जीम, तळजाई येथे ऑक्सिनज पार्क, तारांगण आणि मत्स्यालय (तरतूद तीन कोटी), महापालिका इमारतींवर सौरऊर्जा यंत्रणा, शहरात एलईडी दिव्यांचा वापर, पालिका शाळातील १२ हजार विद्यार्थ्यांना मोबत टॅब, विद्यार्थ्यांसाठी इंद्रधनुष्य कलाविष्कार योजना, विकलांग मुलांना अर्थसाहाय्य, सावित्रीबाई फुले यांच्या नावाने पुरस्कार, बचत गटातील महिलांसाठी सावित्रीच्या लेकी या पाक्षिकाचे प्रकाशन अशाही घोषणा अध्यक्ष कदम यांनी अंदाजपत्रकाच्या माध्यमातून केल्या आहेत.

काही महत्त्वाच्या घोषणा..
संपूर्ण शहर वायफाय करणार
बारा हजार विद्यार्थ्यांना टॅब देणार
पर्वतीवर पेशवाई सृष्टी
पीएमपीसाठी शंभर गाडय़ांची खरेदी
मराठी भवनाची उभारणी
ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र
फेरीवाल्यांसाठी विक्री केंद्र

शहराच्या सर्व भागांना न्याय देण्याचा प्रयत्न मी केला आहे. या अंदाजपत्रकात सर्वसमावेशकतेचे प्रतििबब निश्चितपणे दिसेल याची मला खात्री आहे. शहराच्या विकासाचे मनोहारी व उत्साहवर्धक चित्र उभे केले आहे आणि ते चित्र अत्यंत वास्तववादी आहे.
 अश्विनी कदम, अध्यक्ष, स्थायी समिती