नितीन गडकरी यांची सूचना

‘नागपूरमध्ये ५५ बसगाडय़ा शंभर टक्के ‘बायो-इथेनॉल’वर चालतात. या बसगाडय़ा वातानुकूलित असून त्यांचा आवाज येत नाही व धूरही निघत नाही. मुंबईतील डिझेलवर चालणाऱ्या ‘बेस्ट’ बसचा खर्च प्रतिकिलोमीटर ११० रुपये येतो, तर आमची इथेनॉलवरील बस ७८ रुपये प्रतिकिमी खर्चात पळते. पुण्याची बस सेवाही बायो-इथेनॉलवर हवी,’ अशी सूचना केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली. या डिसेंबपर्यंत देशात बायो इंधनावरील व इलेक्ट्रिक बसगाडय़ा मोठय़ा प्रमाणावर सुरू होतील, असेही ते म्हणाले.

प्राज इंडस्ट्रीजने दौंडमध्ये श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याच्या सहकार्याने सुरू केलेल्या ‘बायो रीफायनरी डेमॉन्स्टेशन प्लँट’चे रविवारी गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. ‘प्राज’चे कार्यकारी अध्यक्ष प्रमोद चौधरी या वेळी उपस्थित होते.

पेट्रोलियम मंत्रालयाकडून ‘सेकंडरी इथेनॉल’ संबंधीचे धोरण बनवले जात असून अपारंपरिक ऊर्जा व पेट्रोलियम मंत्र्यांबरोबर माझी बैठक झाली आहे, असे सांगून गडकरी म्हणाले, ‘‘पेट्रोलियम मंत्रालयाला ‘नोडल एजन्सी’ करून देशाच्या कानाकोपऱ्यात  तेल शुद्धीकरण प्रकल्पांसारखे बायोमास शुद्धीकरण प्रकल्प (बायोमास रीफायनरी) सुरू करावेत, या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. देशात ७ लाख कोटी रुपयांचे खनिज तेल आयात केले जाते. पेट्रोलमध्ये २२ टक्क्य़ांपर्यंत इथेनॉल मिसळता येते. परंतु इथेनॉल उत्पादन कमी असल्यामुळे आपण ५ टक्केही इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळू शकत नाही. विविध ऑटोमोबाईल कंपन्यांच्या मोटारींना अमेरिका, कॅनडा व ब्राझीलमध्ये ‘फ्लेक्स इंजिन’ बसवलेले असते. अशा मोटारींमध्ये २२ टक्के इथेनॉल मिसळलेले पेट्रोल वापरता येतेच, परंतु शंभर टक्के इथेनॉलवरही त्या चालवता येतात.’’ ‘साखरेच्या मळीचे दर वाढल्यामुळे इथेनॉल उत्पादकांना दर मिळत नाही, ही गोष्ट खरी आहे. त्यामुळे इथेनॉलचा पुरवठा पूर्वीच्या तुलनेत १० टक्क्य़ांवर आला. परंतु यावर मार्ग काढण्याची विनंती पेट्रोलियम मंत्र्यांना केली आहे. इथेनॉल उत्पादनास चालना देण्यासाठी लवकरच बैठक घेऊ,’ असे गडकरी यांनी सांगितले.

‘ ‘पतंजली’ची उत्पादने जैव-प्लास्टिकच्या वेष्टनात आणण्याची रामदेव बाबांना विनंती’

‘भविष्यात इथेनॉलपासून ‘बायोपेट’ (विघटनक्षम जैव-प्लास्टिक) तयार होईल. अमेरिका व पश्चिम युरोपमधील काही देशांमध्ये अन्नपदार्थासाठी ‘बायोपेट’च वापरले जाते. रामदेव बाबांनी ‘पतंजली’ची सर्व उत्पादने ‘बायोपेट’च्या वेष्टनात आणावीत, अशी विनंती मी त्यांना केली आहे,’ असे गडकरी यांनी सांगितले. ‘प्राज’ने विमानासाठीचे जैविक इंधन तयार करण्याचे तंत्रज्ञानही विकसित केल्याचे या वेळी सांगण्यात आले.

‘गहू-तांदळापेक्षा कुटाराला अधिक भाव येईल’

येत्या काळात शेतातील ‘बायोमास’ची निर्मिती शेतकऱ्यांसाठी अधिक फायद्याची ठरू शकेल, असे सांगून गडकरी म्हणाले, ‘‘सर्व पिकांच्या टाकाऊ भागाला किंमत असून जैवतंत्रज्ञानाच्या वापराने ‘बायोमास’ तयार करणे व त्यापासून ‘बायो-इथेनॉल’ बनवण्यामुळे देशातील इंधनाची गरज मोठय़ा प्रमाणावर भागवता येईल. गहू-तांदळापेक्षा त्याच्या कुटाराला भाव अधिक येईल. शेतावरील कुटार व तणस वेष्टनीकृत करणे, त्याची वाहतूक करणे,  यातून ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणावर रोजगार निर्माण होऊ शकतो. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्याच्या दृष्टीने अशी नावीन्यपूर्ण संशोधने उपयुक्त ठरतील.’’