05 March 2021

News Flash

डॉक्टर-रुग्ण सुसंवादासाठी ‘पुणे सिटिझन डॉक्टर फोरम’

रुग्णांनी आपल्या चांगल्या अनुभवांच्या आधारे या व्यासपीठावर माहिती भरायची, अशी संकल्पना आहे.

रुग्णांनी आपल्या चांगल्या अनुभवांच्या आधारे या व्यासपीठावर माहिती भरायची, अशी संकल्पना आहे.

रुग्णस्नेही डॉक्टरांचे संकेतस्थळ सुरू करणार

डॉक्टर आणि रुग्णांमधील ताणले गेलेले संबंध सुधारावेत आणि दोषारोपांपलीकडे जाऊन त्याच्यातील संवाद वाढावा यासाठी पुण्यातील काही डॉक्टर एकत्र येत आहेत. रुग्ण व डॉक्टर यांच्यातील दरी कमी करणे आणि काही मूलभूत धोरणात्मक बदलांसाठी समाजजागृती करणे या उद्देशाने ७ एप्रिल रोजी ‘पुणे सिटिझन डॉक्टर फोरम’ हे व्यासपीठ सुरू केले जाणार आहे.

रुग्णस्नेही डॉक्टरांची गरजू रुग्णांना माहिती व्हावी यासाठी त्याअंतर्गत  www.medimitra.org हे संकेतस्थळ तयार करण्यात येत असून रुग्णांनी आपल्या चांगल्या अनुभवांच्या आधारे या व्यासपीठावर माहिती भरायची, अशी संकल्पना आहे.

डॉ. अरुण गद्रे यांनी ही माहिती दिली. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. संजय गुप्ते, डॉ. प्रतिभा कुलकर्णी, त्वचारोग तज्ज्ञ डॉ. विनय कुलकर्णी, बालरोगतज्ज्ञ डॉ. जयंत नवरंगे, सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर, कायदेतज्ज्ञ अ‍ॅड. असीम सरोदे, ग्राहक पेठेचे सूर्यकांत पाठक, पत्रकार यमाजी मालकर यांचा या व्यासपीठाच्या सल्लागार मंडळात समावेश आहे.

चेन्नई, मुंबई व जयपूरमध्ये नागरिकांच्या पुढाकाराने व काही डॉक्टरांच्या सहकार्याने या प्रकारची व्यासपीठे सुरू झाली आहेत, असे सांगून डॉ. गद्रे    म्हणाले, ‘‘युरोपातील अनेक देश, तसेच थायलंड, कॅनडा येथे जशी ‘युनिव्हर्सल हेल्थ केअर’ आहे तशी आरोग्यसेवेची पद्धत भारतात आणणे गरजेचे आहे. या पद्धतीत रुग्णाला वैद्यकीय सेवा देण्यासाठी खाजगी डॉक्टरांना एका स्वायत्त संस्थेकडून रास्त मोबदला मिळतो. यासाठी सरकार मुख्यत: करामधून पशाची व्यवस्था करते. काही ठिकाणी रुग्णांना फार थोडी रक्कम भरावी लागते. हे लांब पल्ल्याचे ध्येय सफल होण्यास बराच काळ लागेल, परंतु नतिकतेने प्रॅक्टिस करत असलेल्या डॉक्टर व रुग्णांची गाठ घालून देणे, वैद्यकीय व्यवसायातील महत्त्वाच्या मुद्दय़ांवर चर्चा घडवणे, चांगल्या गुणवत्तेच्या जेनेरिक औषधाच्या दुकानांना प्रोत्साहन देणे, अशी उद्दिष्टे समोर ठेवण्यात आली आहेत.’’

संकेतस्थळ कार्यान्वित करण्याबरोबरच वैद्यकीय क्षेत्रासंबंधीच्या विषयांवर व्याख्याने, परिसंवादांसारखे कार्यक्रमही आयोजित केले जातील, असेही त्यांनी सांगितले.

उपक्रम काय?

* संकेतस्थळ सुरू झाल्यावर रुग्णांनी रुग्णस्नेही डॉक्टरची नोंद त्यावर करायची आहे. त्यासाठी खालील मुद्दय़ांचा आधार घेतला जाईल.

* डॉक्टरांनी तुम्हाला पुरेसा वेळ दिला का?

* तुमचे म्हणणे ऐकून घेतले का?

* आजाराबद्दल व उपचाराबाबत योग्य माहिती दिली का?

* डॉक्टरांनी विशिष्ट औषधांच्या दुकानातूनच औषधे आणण्यास सांगितले का?

* रुग्णाला रुग्णालयात दाखल केले असल्यास उपचारांच्या दराबाबत पारदर्शकता होती का? इ.

* यात रुग्णांची नावे अर्थातच जाहीर होणार नाहीत.

पुढे काय?

जास्तीत जास्त रुग्णांनी चांगला अनुभव आलेल्या डॉक्टरबद्दलची माहिती संकेतस्थळावर भरण्यावर उपक्रमाची उपयुक्तता अवलंबून आहे. अनेकविध डॉक्टरांची नोंद जमा झाली की संकेतस्थळाचे ‘सर्च इंजिन’ सुरू केले जाईल. म्हणजे एखाद्या गरजू रुग्णाला जर रुग्णस्नेही प्रॅक्टिस करणारा डॉक्टर शोधायचा असेल, तर त्याला इतर रुग्णांनी सुचवलेल्या अशा डॉक्टरांची यादी मिळेल. संकेतस्थळावरून कळलेल्या डॉक्टरकडे जाऊन आल्यावर रुग्णाचा जो काही अभिप्राय असेल तो बहुसंख्य रुग्ण भरतील आणि उपलब्ध माहिती अचूक होण्यास त्याची मदत होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2017 2:16 am

Web Title: pune citizen doctor forum for doctor patient interaction
Next Stories
1 जंगली महाराज रस्त्याचे ‘अरुंदीकरण’
2 ब्रॅण्ड पुणे : बागकामवेडय़ांच्या कौतुकाचे
3  ‘काही वैचारिक ऐकावे अशी शहरी लोकांची मानसिकता नाही’
Just Now!
X