13 July 2020

News Flash

पुण्यनगरी गणेशमय!

शहरातील अवघे वातावरण गणेशमय झाले असून प्राणप्रतिष्ठापनेच्या मिरवणुकीची तयारी करण्यामध्ये कार्यकर्ते गुंतले आहेत.

‘ज्युरॅसिक पार्क’ हा बाळगोपाळांच्या आवडीच्या विषयावर टिळक रस्त्यावरील गणेश मित्र मंडळातर्फे देखावा साकारला जात आहे. या ज्युरॅसिक पार्कमधील प्राणी हुबेहूब साकारण्यात आले असून त्यांचे रंगकाम करण्यात कलाकार मग्न झाला आहे. (छायाचित्र : अरूल होरायझन)

गणरंगी रंगून जाण्यासाठी आता एका दिवसाचीच प्रतीक्षा; मानाच्या गणपतींची उद्या मुहूर्तावर प्राणप्रतिष्ठापना

जगभरात नावाजलेल्या पुण्यनगरीच्या वैभवशाली गणेशोत्सवाला प्रारंभ होण्यासाठी आता अवघ्या एका दिवसाचीच प्रतीक्षा उरली असून कार्यकर्त्यांची लगीनघाई सुरू झाली आहे. शहरातील अवघे वातावरण गणेशमय झाले असून प्राणप्रतिष्ठापनेच्या मिरवणुकीची तयारी करण्यामध्ये कार्यकर्ते गुंतले आहेत. गणेश चतुर्थीला गुरुवारी (१३ सप्टेंबर) मानाच्या गणपतींची मुहुर्तावर विधिवत पूजन करून प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सव पूर्तीचे वर्ष असल्यामुळे यंदा गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याबरोबरच दिमाखदारपणे साजरा करण्याकडे कार्यकर्त्यांचा कल आहे. गणेश मंडळांच्या मंडप उभारणीचे काम पूर्णत्वास गेले असून देखाव्याच्या साकारणीचे कामही आता अंतिम टप्प्यात आले आहे. कार्यकर्त्यांना आता गणरायाच्या प्रतिष्ठापना मिरवणुकीचे वेध लागले आहेत. ढोल-ताशा पथकांना निमंत्रणे, बँडपथकांच्या वेळा निश्चित करणे, गुरुजींना वेळेची आठवण करून देणे आणि प्रतिष्ठापना ज्यांच्या हस्ते करावयाची त्या प्रमुख पाहुण्यांची निश्चिती या साऱ्या कामांना गती आली आहे. मानाच्या गणपतींची मुहुर्तावर विधिवत पूजा करून प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.

श्री कसबा गणपती

पुण्यनगरीचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती या मानाच्या पहिल्या गणपतीची प्रतिष्ठापना गुरुवारी सकाळी ११ वाजून ५२ मिनिटांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह भैयाजी जोशी यांच्या हस्ते होणार आहे. प्रतिष्ठापनेनंतर जोशी यांच्या हस्ते अभिनेते सुबोध भावे, वेदमूर्ती प्रकाश दंडगे, बास्केटबॉल संघाच्या कर्णधार शिरीन लिमये, एमआयटीचे राहुल कराड आणि आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. योगेश बेंडाळे यांना श्री कसबा गणपती पुरस्कार तर, ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. भास्करराव आव्हाड यांना अ‍ॅड. भाऊसाहेब निरगुडकर पुरस्कार प्रदान  करण्यात येणार आहे. प्रतिष्ठापनेपूर्वी उत्सव मंडपातून ८.३० वाजता मिरवणूक निघणार असून हमालवाडा येथून नीलेश पार्सेकर यांच्याकडून मूर्ती घेतल्यानंतर मिरवणूक पुन्हा उत्सव मंडपात येईल.

मंडळातर्फे यंदाच्या उत्सवात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ निवृत्त अधिकारी संघाच्या सहकार्याने ई-कचरा संकलन मोहीम २२ सप्टेंबपर्यंत राबविण्यात येणार आहे.

श्री तांबडी जोगेश्वरी मंडळ 

ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी मंडळ या मानाच्या दुसऱ्या गणपतीची मिरवणूक सकाळी १० वाजता उत्सव मंडपातून निघणार आहे. न्यू गंधर्व बँडपथक, शिवमुद्रा आणि ताल ही ढोल-ताशापथके मिरवणुकीच्या अग्रभागी असतील. आप्पा बळवंत चौक, लोखंडे तालीम, कुंटे चौक, लक्ष्मी रस्त्याने गणपती चौकमार्गे मिरवणूक उत्सव मंडपामध्ये येईल.  व्यावसायिक अमोल रावेतकर यांच्या हस्ते दुपारी १२ वाजता गणपतीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.

श्री गुरुजी तालीम मंडळ

मानाच्या तिसऱ्या श्री गुरुजी तालीम मंडळातर्फे यंदा काल्पनिक गणेश महाल साकारण्यात आला आहे. या महालामध्ये उद्योजक आदित्य शर्मा आणि अर्चना शर्मा यांच्या हस्ते दुपारी १२.३० वाजता गणपतीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. त्यापूर्वी सुभाष सरपाले यांनी सजविलेल्या फुलांच्या रथातून दहा वाजता निघणाऱ्या मिरवणुकीत नादब्रह्म, गर्जना, शिवरूद्र आणि गुरुजी प्रतिष्ठान ही ढोल-ताशा पथके सहभागी होणार आहेत.

श्री तुळशीबाग मंडळ

अक्कलकोट येथील स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या हस्ते श्री तुळशीबाग मंडळ या मानाच्या चौथ्या गणपतीची दुपारी १२.३० वाजता प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. युवा कलाकार विपुल खटावकर यांनी साकारलेल्या काल्पनिक गणेश महालामध्ये गणराय विराजमान होतील. त्यापूर्वी गणपती चौक येथून सकाळी ९.३० वाजता निघणाऱ्या मिरवणुकीमध्ये लोणकर बंधू यांचा नगारखाना, स्वामी प्रतिष्ठान, उगम आणि गजर ही ढोल-ताशा पथके असतील.

केसरीवाडा गणेशोत्सव

केसरीवाडा गणेशोत्सवाच्या मिरवणुकीला सकाळी १० वाजता रमणबाग चौकातून सुरूवात होईल. श्रीराम, शिवमुद्रा ही ढोल-ताशा पथके सहभागी होणार आहेत. लक्ष्मी रस्ता, विजय चित्रपटगृह, माती गणपती मार्गे मिरवणूक केसरीवाडय़ातील सभामंडपात आल्यानंतर रोहित टिळक यांच्या हस्ते ११.३० वाजता गणरायाची प्राणप्रतिष्ठापना होईल.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या श्रींची प्राणप्रतिष्ठापना महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता होणार आहे. त्यापूर्वी सकाळी ८.३० वाजता ट्रस्टच्या पारंपरिक रथातून निघणाऱ्या मिरवणुकीत समर्थ, श्रीराम, शिवछत्रपती आणि उगम ही ढोल-ताशापथके सहभागी होणार आहेत.

अखिल मंडई मंडळ

युवा कलाकार विशाल ताजणेकर यांनी साकारलेल्या काल्पनिक राजस्थानी महालामध्ये अखिल मंडई मंडळाच्या शारदा-गजानानाची मूर्ती विराजमान होणार आहे. बीव्हीजी ग्रुपचे हणमंतराव गायकवाड यांच्या हस्ते सकाळी ११. ३० वाजता प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. त्यापूर्वी मंडळाच्या समाज मंदिरापासून मिरवणूक निघणार असून महात्मा फुले मंडई, रामेश्वर चौक गोटीराम भैया चौक, झुणका-भाकर केंद्र या मार्गाने मिरवणूक उत्सव मंडपात येईल.

दगडूशेठ हलवाई गणपती

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या श्रींची प्राणप्रतिष्ठापना धुंडिराज पाठक यांच्या हस्ते सकाळी ११ वाजून १ मिनिटांनी होणार आहे.त्यापूर्वी गणपती मंदिरापासून सकाळी ८.३० वाजता फुलांनी सजविलेल्या रथातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. आप्पा बळवंत चौक, शनिपार चौक, टिळक पुतळा मंडईमार्गे उत्सव मंडपात मिरवणूक येणार आहे. देवळणकर बंधूचा चौघडा, गायकवाड बंधू सनई, दरबार बँड, मयूर बँड आणि मानिनी महिला ढोल-ताशा पथकाचा मिरवणुकीत सहभाग असणार आहे. विवेक खटावकर यांनी साकारलेल्या तंजावर येथील श्री राजराजेश्वर मंदिरावरील विद्युत रोषणाईचे उद्घाटन खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते सायंकाळी ७ वाजता होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 12, 2018 4:21 am

Web Title: pune city are ganeshmay
Next Stories
1 खरेदी उत्साहामुळे कोंडी!
2 ‘लोकसत्ता’तर्फे यंदाही ‘इकोफ्रेंडली घरगुती गणेशोत्सव स्पर्धा’
3 प्रश्न तुमचे उत्तर पंचांगकर्त्यांचे : गणेश प्राणप्रतिष्ठापनेबाबत या गोष्टी माहित असायलाच हव्यात
Just Now!
X