तापमानातील घट तीन दिवस राहण्याची शक्यता

पुणे शहर आणि परिसरामधील किमान तापमानात घट झाल्याने रात्रीच्या थंडीत पुन्हा वाढ झाली आहे. दिवसाच्या कमाल तापमानातही अचानकपणे मोठी घट नोंदविली गेल्याने दिवसाही काहीसा गारवा जाणवतो आहे. पुढील दोन ते तीन दिवस तापमानातील घट कायम राहणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने दिला आहे. दरम्यान, कोरडय़ा हवामानाच्या स्थितीमुळे राज्याच्या विविध भागातही थंडी वाढली आहे. ही स्थिती फेब्रुवारीच्या सुरुवातीपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.

उत्तरेकडून येणारे थंड वाऱ्यांचे प्रवाह मंदावल्यामुळे आणि अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागरावरून उष्ण वाऱ्यांचे प्रवाह सुरू झाल्याने राज्यातील थंडी कमी झाली होती. मात्र, सध्या राज्याच्या अनेक भागात कोरडय़ा हवामानाची स्थिती आहे. त्यामुळे थंडीत पुन्हा वाढ झाली आहे. पुणे शहर आणि परिसरातही गेल्या काही दिवसांपासून तापमानात चढ-उतार नोंदविले जात आहेत. जानेवारीच्या मध्यापासून शहरात कमी-अधिक प्रमाणात थंडी आहे. आठवडय़ापासून किमान तापमानात वाढ होऊन ते १५ अंश सेल्सिअसच्या आसपास गेल्याने थंडी कमी झाली होती. मात्र, मंगळवारी संध्याकाळपासून पुन्हा हवेत गारवा जाणवू लागला आहे.

मंगळवारी शहर आणि परिसरातील किमान तापमान १५.६ अंश नोंदविले गेले होते. त्यात बुधवारी झपाटय़ाने घट होत १३.६ अंश किमान तापमानाची नोंद झाली. त्यामुळे संध्याकाळनंतर हवेत चांगलाच गारवा जाणवत होता. काही प्रमाणात बोचऱ्या वाऱ्यांचाही अनुभव मिळत होता. त्यामुळे उबदार कपडे घालण्याशिवाय नागरिकांना पर्याय नव्हता.

दिवसाच्या कमाल तापमानात प्रामुख्याने झपाटय़ाने घट झाली आहे. ३० अंशांपुढे असलेले कमाल तापमान बुधवारी २६.७ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले. हे तापमान सरासरीपेक्षा ४ अंशांनी कमी आहे. त्यामुळे दुपारीही हवेत चांगलाच गारवा जाणवत होता.

सकाळी धुके पडण्याचा अंदाज

पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार ३० जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत तापमानात मोठय़ा प्रमाणावर बदल होणार नाही. या कालावधीत शहरात आकाश अंशत: ढगाळ राहणार आहे. त्याचप्रमाणे सकाळी शहरात तुरळक ठिकाणी धुके पडण्याचाही अंदाज आहे. दिवसाचे कमाल तापमान ३० अंशांच्या आत, तर रात्रीचे किमान तापमान १३ ते १५ अंशांपर्यंत राहण्याची शक्यता आहे. ४ फेब्रुवारीनंतर आकाश निरभ्र होणार आहे.