पुण्याच्या सिंहगड परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. करोनाची लागण झालेल्या एका ७५ वर्षीय महिलेवर डॉक्टरांनी उपचार केले आणि ती करोनामुक्त झाली. पण, करोनामुक्त झाल्यानंतर त्या ज्येष्ठ महिलेला तिच्या मुलाने आणि सुनेने घरात घेण्यासच नकार दिला. मात्र, वेळीच सिंहगड पोलिसांनी हस्तक्षेप करत वृद्धेच्या मुलाला आणि सुनेला जाब विचारत पुन्हा त्या जेष्ठ महिलेला घरात प्रवेश मिळवून दिला.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, १३ मार्च रोजी ७५ वर्षांच्या वृद्ध महिलेला करोना व्हायरसची लागण झाल्यामुळे उपचारासाठी सिंहगड रोडवरील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. सिंहगड रोड पोलिस स्थानकातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचा मुलगा रिक्षाचालक असून ते नऱ्हे परिसरात राहतात. करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर महिलेला सिंहगड रोडवरील कोविड सेंटरमध्ये भरती करण्यात आलं होतं.

आणखी वाचा- “नियम पाळा, अन्यथा लॉकडाऊन!” पुणे-पिंपरी चिंचवडकरांना अजित पवारांचा २ एप्रिलपर्यंतचा अल्टिमेटम!

“मंगळवारी आम्हाला कोविड सेंटरमधून एक फोन आला, त्यावर एका ७५ वर्षीय वृद्ध महिलेचे नातेवाईक तिला रुग्णालयातून घेऊन जाण्यास टाळाटाळ करत असल्याचं सांगण्यात आलं. सुरूवातीला महिलेच्या घरातील कोणीही फोन उचलत नव्हतं, नंतर फोन उचलल्यावर कोविड सेंटरमधील कर्मचाऱ्यांनी महिलेला घरी घेऊन जाण्यास सांगितलं. त्यावर तुम्हाला तिच्यासोबत जे करायचंय ते करा असं उत्तर फोनवर मिळालं”, अशी माहिती सिंहगड रस्ता पोलिस स्थानकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देविदास घेवारे यांनी दिली.

“त्यानंतर आम्ही संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास रुग्णवाहेकितून ज्येष्ठ महिलेला आणि तिच्यासोबत दोन पोलिसांना पाठवलं. पण त्यांच्या घराच्या दरवाजाला कुलूप होतं….आमची लोकं तिथे संध्याकाळी ८ वाजेपर्यंत वाट बघत होते, पण महिलेच्या मुलाने आणि सुनेने आज परत येणार नसल्याचं सांगितलं. वृद्ध महिलेला खूप अशक्तपणा होता, त्यामुळे तिथे तिच्या मुलाची आणि सुनेची वाट बघण्यात काही अर्थ नव्हता. म्हणून आम्ही पुन्हा त्याच कोविड सेंटरला संपर्क साधून अजून एका रात्रीसाठी महिलेची सोय करण्याची विनंती केली, आणि आम्ही परतलो”, असं घेवारे यांनी सांगिंतलं.

पुढे बोलताना घेवारे म्हणाले की, “नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी महिलेच्या मुलाला आणि सुनेला पोलिस स्थानकात बोलावून विचारणा करण्यात आली. त्यावर महिलेला घरी न घेण्यासाठी वेगवेगळी कारणं देण्यास त्यांनी सुरूवात केली. त्यानंतर आम्ही त्यांचं समुपदेशन केलं, त्यांना पालक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या काळजी व कल्याणासाठी असलेल्या कायदेशीर कायद्यांबाबत आणि कायदेशीर कारवाईचा सामना कसा करावा लागू शकतो याबाबत जागरूक केलं. नंतर अखेर ते महिलेला घरी घेऊन जाण्यास तयार झाले”