व्यवहार ठप्प; रस्त्यांवरील गर्दीही ओसरली

पुणे : शहरात मंगळवारपासून पुन्हा टाळेबंदी लागू करण्यात आल्यानंतर शुकशुकाट असल्याचे पाहायला मिळाले. शहरातील व्यवहार ठप्प झाल्याने गेल्या काही दिवसांपासून रस्त्यांवर झालेली गर्दीही ओसरली. शहरातील बहुतांश रस्ते बांबूचे अडथळे टाकून अडवण्यात आले होते.

शहरात दहा दिवसांसाठी टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. वाढत्या करोनाबाधितांच्या संख्येमुळे प्रशासनाकडून टाळेबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. २३ जुलै रोजी टाळेबंदी संपणार आहे. टाळेबंदी लागू झाल्याची घोषणा झाल्यानंतर शहरात गेले तीन दिवस जीवनावश्यक वस्तू, किराणा माल आणि भाजीपाला खरेदीसाठी झुंबड उडाली होती. टाळेबंदीतील पहिले पाच दिवस कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दूध, औषधे विक्री, वृत्तपत्र वितरणाला मुभा देण्यात आली आहे. शुक्रवारनंतर (१७ जुलै) टाळेबंदीतील निर्बंध काहीसे शिथिल करण्यात येणार आहेत. टाळेबंदी सोमवारी मध्यरात्रीपासून लागू झाल्यानंतर शहरातील सर्व प्रमुख रस्ते तसेच गल्ली-बोळातील रस्त्यांवर बांबूचे अडथळे उभारण्यात आले. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, खासगी कंपनीतील कर्मचाऱ्यांना कामावर जााण्यास मुभा देण्यात आली आहे.

मंगळवारी सकाळी शहरातील प्रमुख मार्गावर फारशी वाहने दिसत नव्हती. निर्बंध शिथिल झाल्यानंतर शहरात वाहतूक वाढली होती. मात्र, टाळेबंदी लागू झाल्यानंतर सर्वच व्यवहार ठप्प असल्याने सर्वत्र शुकशुकाट असल्याचे पाहायला मिळाले. शहरातील प्रमुख चौकांत पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. चौकाचौकात असलेल्या पोलिसांकडून वाहनचालकांची तपासणी करण्यात येत होती. ओळखपत्र पाहून त्यांना सोडण्यात येत होते.

संचेती चौकात वाहनांच्या रांगा

टाळेबंदी लागू झाल्यानंतर पुणे शहरातील सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. शहरातील मध्य भागाकडे येणाऱ्या शिवाजीनगर येथील संचेती चौकात मंगळवारी कोंडी झाली होती. शहरात येणाऱ्या प्रत्येक वाहनाची  तपासणी करण्यात येत असल्याने तेथे वाहनांची गर्दी झाली होती. गणेशखिंड रस्त्यावरील ई-स्क्वेअर मल्टिप्लेक्स समोरील उड्डाण पूल पाडण्यात येणार असल्याने गणेशखिंड रस्ता वाहतुकीसाठी बंद  आहे. त्या रस्त्याकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आल्याने या भागात गर्दी झाली होती.

टाळेबंदीत सात हजार पोलिसांचा बंदोबस्त

टाळेबंदीच्या दहा दिवसांच्या कालावधीसाठी शहरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. शहर, उपनगरात सात हजार पोलीस बंदोबस्तासाठी असणार आहेत.