महापालिका पर्यावरण सद्य:स्थिती अहवालातील निरीक्षण

वाढते शहरीकरण आणि सुधारित जीवनशैलीचा वाढत असलेला कल तसेच अतिरिक्त लोकसंख्येमुळे नैसर्गिक साधनसंपत्तीवर येणाऱ्या ताणामुळे शहराच्या पर्यावरणावर थेट परिणाम होत असून जमिनीच्या वापरातील बदल आणि वाढणारी बांधकामे या मानवी हस्तक्षेपामुळे शहरातील पृष्ठभागीय आणि उपपृष्ठभागीय (अर्बन हीट आयलंड इफेक्ट) तापमानामध्ये मोठय़ा प्रमाणावर वाढ होत असल्याचे निरीक्षण महापालिकेच्या पर्यावरण अहवालात नोंदविण्यात आले आहे. महापालिकेकडून देण्यात येत असलेल्या चटई क्षेत्र निर्देशांकात (फ्लोअर स्पेस इंडेक्स-एफएसआय) एका वर्षांत १० लाख ९४ हजार २३१ चौरस मीटरने वाढ झाल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

महापालिकेचा सन २०१६-१७ या वर्षांचा पर्यावरण सद्य:स्थिती अहवाल महापालिका प्रशासनाकडून शुक्रवारी मुख्य सभेला सादर करण्यात आला. पायाभूत सुविधा पुरविताना शहरीकरणामुळे शहराच्या पर्यावरणावर काय परिणाम झाला आहे, याबाबतची निरीक्षणे या अहवालात नोंदविण्यात आली आहेत. शहरवाढीला चालना देणारे घटक, त्यामुळे शहरावर पडणारा ताण, पर्यावरणाच्या स्थितीबरोबरच जलव्यवस्थापन, वाहतूक नियोजन, मलनिस्सारण, घनकचरा व्यवस्थापनाच्या उपाययोजना या बाबींवर हा अहवाल तयार करण्यात आला आहे. या अहवालात ‘अर्बन हीट आयलंड इफेक्ट’ या संकल्पनेचा समावेश करण्यात आला असून शहराच्या पर्यावरणावर त्याचा मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

‘अर्बन हीट आलयंड इफेक्ट म्हणजे पृष्ठभागीय आणि उपपृष्ठभागीय तापमानामध्ये विविध कारणांनी वाढ झाली आहे. जमिनीच्या वापरातील बदल आणि वाढणारी बांधकामे या मानवी हस्तक्षेपाचा परिणामही अर्बन हीट आयलंड इफेक्ट वाढविण्यास कारणीभूत ठरला आहे. सिमेंटचे रस्ते, पदपथांची निर्मिती, कोथरूड किंवा सहकारनगर सारख्या भागात वेगाने होणाऱ्या नागरीकरणामुळे त्याचे दृश्य परिणाम दिसत आहेत. हा परिणाम कमी करण्यासाठी हरित पट्टय़ाची निर्मिती करणे हीच प्रमुख उपाययोजना असून नागरीकरण होणाऱ्या देशभरातील अन्य महत्त्वाच्या शहरांमध्येही हा प्रकार दिसून येत आहे,’ अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली.

विमान प्रवास करणाऱ्यांच्या पुण्यातील प्रवाशांच्या संख्येत एका वर्षांत दुपटीने वाढ झाली आहे. सन २०१३-१४ पासून विमान प्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षात घेता सन २०१६-१७ मध्ये ही संख्या ६५ लाख १५ हजार पाच एवढी आहे. शहरीकरण आणि सुधारित जीवनशैलीचा कल वाढत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

गेल्या वर्षांत एफएसआय देण्यामध्ये १० लाख ९४ हजार २३१ चौरस मीटरने वाढ झाली असून सन २०१६-१७ या वर्षांत ४२ लाख ९७ हजार ८७ चौरस मीटर बांधकामांना एफएसआयमुळे परवानगी मिळाली आहे.

अर्बन हीट आयलंड इफेक्ट संकल्पना

उंच इमारती, रस्ते, सिमेंट पदपथाच्या बांधकामांमुळे असे पृष्ठभाग तयार होतात जे सूर्यप्रकाशातील उष्णता शोषून घेतात आणि परावर्तित करतात. यामुळे सभोवतालची हवा जलद गतीने तापते. गडद रंगाची छते, जमिनीच्या वापरातील बदल, सिमेंटचे रस्ते, झाडांचे कमी होत असलेले अस्तित्व आदी घटक तापमानावाढीला कारणीभूत आहेत. या घटकांचे मानवी आरोग्यावरही परिणाम जाणवत असून उष्माघात, डोकेदुखी, थकवा अशी लक्षणे दिसून येत आहेत.