पुणे : शहरातून दररोज पाच ते सहा दुचाकी वाहने चोरीला जात आहेत. दुचाकींबरोबरच शहरात मोटारी चोरीचे गुन्हेही वाढले आहेत. महागडय़ा मोटारींची सुरक्षा यंत्रणा भेदण्याचे तंत्र चोरटय़ांना अवगत आहे. गेल्या वर्षभरात शहरातून १३९ मोटारी चोरीला गेल्या. मोटार चोरीच्या घटनांचे अवलोकन केल्यास आठवडय़ातून दोन ते तीन  मोटारी चोरीला जात असल्याचे उघडकीस आले आहे.

गेल्या वर्षभरात पुणे शहरातून १६७० दुचाकी वाहने तसेच १३९ मोटारी चोरीला गेल्या. शहरात दुचाकी चोरीचे प्रमाण मोठे असून दररोज पाच ते सहा दुचाकी वाहने चोरीला जात आहेत. दुचाकी वाहनांबरोबरच शहरात मोटार चोरीचे प्रमाण वाढत आहे. शहरात वाहने लावण्यास जागा उपलब्ध नाही. अनेक सोसायटय़ांमध्ये खास मोटारी लावण्यासाठी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे मोटार चालक रात्री रस्त्याच्या कडेला मिळेल त्या जागेत मोटारी लावतात. रस्त्याच्या कडेला लावलेल्या मोटारी चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. गेल्या आठवडय़ात भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक दीपक पोटे यांची महागडी मोटार दत्तवाडी भागातील रक्षालेखा सोसायटीच्या समोरुन चोरीला गेली होती. पोटे यांच्या मोटारीचा अद्याप शोध लागलेला नाही.

दुचाकी वाहनाच्या तुलनेत मोटार चोरणे तसे अवघड आहे. महागडय़ा मोटारींची सुरक्षा यंत्रणा सक्षम असते. त्यामुळे महागडय़ा मोटारी चोरीला जात नाहीत, असा समज आहे.

मात्र, महागडय़ा मोटारी लांबविण्यात आल्यामुळे चोरटय़ांना महागडय़ा मोटारी लांबविण्याचे तंत्र अवगत असल्याचे दिसत आहे. वाहन चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी उपाययोजना सुरु केल्या आहेत. ज्या भागात वाहनचोरीचे गुन्हे घडतात, अशा भागात साध्या वेशातील पोलिसांनी गस्त घालावी, अशी सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मोटार चोरी रोखण्यासाठी ‘जीपीएस’

मोटार चोरीच्या घटना रोखण्यासाठी चालकांनी ‘जीपीएस’ यंत्रणा बसवल्यास चोरलेल्या मोटारीचा माग काढणे शक्य होते. ‘जीपीएस’यंत्रणा महाग नाही. महागडय़ा मोटारींपेक्षा चोरटे साध्या श्रेणीतील मोटारी लांबवितात. ‘जीपीएस’ यंत्रणेमुळे मोटार चोरीच्या घटना रोखणे शक्य होईल. दुचाकी वाहन चालकांनी चाकाला अतिरिक्त कुलूप लावल्यास त्याचा फायदा होईल. त्यामुळे चोरीच्या घटनांना काही प्रमाणात आळा बसेल, अशी माहिती गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली.

वाहन चोरीच्या घटना रोखण्यात अपयश

शहरातून दुचाकी वाहने चोरीला जाण्याचे प्रमाण अधिक आहे. पोलिसांकडून दुचाकी चोरटय़ांना पकडले जाते. त्यांच्याकडून दुचाकी वाहने देखील जप्त केली जातात. मात्र, पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या उपाय योजना तकलादू  ठरत आहेत.

शहरातील वाहन चोरीच्या घटना

वर्ष          दुचाकी           चारचाकी      तीनचाकी

२०१८        १६७०               १३९               ४८