पुण्यातील लोहगाव येथील भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानाचे टायर धावपट्टीवर फुटल्याने सोमवारी सकाळी ११:२० ते दुपारी १:४५ या कालावधीत विमान वाहतुकीवर परिणाम झाला. या कालावधीत एकाही विमानाचे उड्डाण झाले नाही. त्यामुळे १६ विमान सेवांवर परिणाम झाल्याची माहिती लोहगाव विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली.

पुण्यातील लोहगाव विमानतळावर हवाई दलाचे सुखोई विमान सकाळी ११:२० वाजण्याच्या सुमारास धावपट्टीवर उतरत असताना टायर फुटले. या घटनेमुळे विमान सेवा पूर्णपणे थांबविण्यात आली. त्या दरम्यान कर्मचार्‍यांकडून धावपट्टीवरून हे विमान बाजूला करण्यासाठी अडीच तास लागले.

या अडीच तासांमध्ये तब्बल १६ विमानांवर परिणाम झाला यामुळे विमानतळावर आलेल्या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले.