18 January 2019

News Flash

पुणेकरांचे आरोग्य वाऱ्यावर

पावसाळ्याच्या कालावधीत डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनिया या सारखे आजार उद्भवतात.

कीटकनाशक औषधांची खरेदी रखडली, रिक्त पदांमुळे कामगारांची ठेकेदारामार्फत भरती

पावसाळ्याच्या कालावधीत डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनिया या सारखे आजार फैलावण्याची भीती असताना महापालिकेच्या आरोग्य विभागाचा हलगर्जीपणा समोर आला आहे. या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या कीटकनाशक औषधांची खरेदी अधिकाऱ्यांतील समन्वयाअभावी रखडली आहे. सध्या जून महिनाअखेपर्यंत पुरेल एवढा औषधांचा साठा आरोग्य विभागाकडे असून महापालिकेच्या स्तरावर औषध खरेदी करण्याचे शहाणपण महापालिकेला उशिरा सुचले आहे. एका बाजूला औषध खरेदी प्रक्रिया रखडली असताना दुसऱ्या बाजूला प्रशिक्षितकर्मचारी वर्गाच्या जागा रिक्त असल्यामुळे पावसाळ्यापुरत्या काही जागा ठेकेदारामार्फत भरण्याचे नियोजन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्याच्या कालावधीत पुणेकरांचे आरोग्य वाऱ्यावर राहणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.

पावसाळ्याच्या कालावधीत डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनिया या सारखे आजार उद्भवतात. अलीकडच्या काही वर्षांत तर कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणावर वाढला आहे. या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य विभागाकडून दरवर्षी औषध खरेदी करण्यात येते. यंदा मात्र ही औषध खरेदीची प्रक्रिया रखडली आहे.

महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांची बदली झाल्यानंतर अतिरिक्त आयुक्त शीतल उगले-तेली यांच्याकडे आयुक्तपदाचा प्रभारी कारभार देण्यात आला. त्यानंतर आरोग्य विभागातील काही अधिकाऱ्यांच्या बदल्याही झाल्या. त्यामुळे एप्रिल आणि मे महिन्यात होणारी औषधांची खरेदी रखडली. ही खरेदी कोणी करायची यावरून अधिकाऱ्यांमध्येही समन्वय राहिला नाही. त्यामुळे जून महिना उजाडला तरी कीटकजन्य औषधांच्या खरेदीची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. सध्या जून महिन्यापर्यंत पुरेल एवढाच औषधांचा साठा उपलब्ध असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

दरम्यान, औषधांची खरेदी रखडली असल्याचे पुढे आल्यानंतर आरोग्य विभागाकडून खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्यामुळे किमान तीन आठवडय़ांचा कालावधी त्यासाठी लागणार आहे. त्यामुळे औषधे उपलब्ध होण्यास जुलै महिना उजाडणार आहे.

महापालिकेच्या हद्दीमध्ये नव्याने अकरा गावांचा समावेश झाला आहे. त्यामुळे या गावांमध्येही महापालिकेला आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागणार आहेत. या गावांचा समावेश झाल्यानंतर राज्याच्या आरोग्य विभागाकडून औषधांचा काही साठा महापालिकेला देण्यात आला. त्यावरच सध्या महापालिकेचा कारभार सुरू आहे.

दरम्यान, साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पावसाळ्यात महापालिकेकडून धूरफवारणी केली जाते. मात्र प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध नसल्यामुळे आरोग्य विभाग मेताकुटीला आला आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या चार महिन्यांच्या कालावधीत ठेकेदारी पद्धतीने साडेतीनशे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची वेळ आरोग्य विभागावर आली आहे. एका बाजूला औषधे खरेदीची प्रक्रिया रखडली असताना कंत्राटी पद्धतीने कर्मचारी नियुक्त करण्याची विसंगतीही या निमित्ताने पुढे आली आहे.

२१३ पदे रिक्त

साथीचे आजार किंवा कीटकजन्य आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून धूरफवारणी आणि डास आळी निर्मूलनासंदर्भात अन्य उपाययोजना केल्या जातात. महापालिकेच्या आरोग्य विभागासाठी ५१३ विविध दर्जाची पदे मान्य झाली आहेत. त्यापैकी २१३ पदे रिक्त आहेत. त्यामुळे साडेतीनशे कर्मचारी कंत्राटी पद्धतीने महापालिकेकडून चार महिन्यांच्या कालावधीत घेण्यात येणार आहेत. रिक्त पदांचा फटका आरोग्य विभागाला बसला असून ही पदे तत्काळ भरावीत, यासाठी आरोग्य विभागाकडून पाठपुरावा सुरू झाला आहे. शहराचा वाढता विस्तार आणि त्यातच अकरा गावांचा समावेश झाल्यामुळे या कर्मचाऱ्यांवरच अतिरिक्त ताण येणार असून डास आळी निर्मूलनाच्या ठोस उपाययोजना होण्याबाबतही साशंकता व्यक्त  होत आहे.

First Published on June 14, 2018 2:19 am

Web Title: pune civilians health issue pmc