डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी बुधवारी (२१ ऑगस्ट) सर्वपक्षीय पुणे बंद पुकारण्यात आला असून सकाळी दहा वाजता महात्मा फुले यांच्या पुतळ्यापासून निषेध रॅलीचेही आयोजन करण्यात आले आहे.
डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा पुण्यातील सर्व राजकीय पक्षांनी तीव्र निषेध केला असून या घटनेचा निषेध बुधवारी पुणे बंद पाळून केला जाणार आहे. या बंदमध्ये पुणेकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. या घटनेच्या निषेधार्थ सकाळी दहा वाजता महापालिका भवनातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यापासून रॅलीचे आयोजन करण्यात आले असून मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्याजवळ या रॅलीची जाहीर सभेने सांगता होईल.
महापालिकेत श्रद्धांजली सभा
डॉ. दाभोलकर यांना पुणेकरांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यासाठी महापालिकेतर्फे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा महापालिकेच्या छत्रपती शिवाजीमहाराज सभागृहात दुपारी साडेतीन वाजता होणार असल्याचे महापौर वैशाली बनकर यांनी सांगितले.