पुणे प्रतिनिधी: पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात श्रावणमासानिमित सत्यनारायण पूजा करण्यात आली. या पूजेवरून वाद झाला असून काही विद्यार्थी संघटनांनी त्यावर आक्षेप घेतला. त्यामुळे महाविद्यालय परिसरात तणावाचे वातवारण निर्माण झाले आहे.
फर्ग्युसन महाविद्यालयाचे उपप्राचार्यांच्या कार्यालयात सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले. याच कार्यालयाबाहेर असणाऱ्या फलकावर सर्व विद्यार्थ्यांनी पूजेचा आणि प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. या पूजेची माहिती विद्यार्थ्यांना मिळताच त्यांनी प्राचार्यांना घेराव घालत जाब विचारला. मागील अनेक वर्षांपासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून सत्यनारायणाची पूजेचे आयोजन केले जात असल्याने या वर्षीही पूजेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्राचार्य रवींद्रसिंह परदेशी यांनी दिली. पूजेचे आयोजन करुन आम्ही अनेक वर्षांपासून सुरु असलेली ही परंपरा पाळल्याचे स्पष्टीकरण या वादावर त्यांनी दिले.
आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांपैकी एक असणाऱ्या कुलदीप आंबेकर याने पूजेला विरोध करण्याबद्दल बोलताना महाविद्यालयामध्ये कोणत्याही एका धर्माचे उदात्तीकरण करणे हे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. तुम्ही सत्यनारायणाची पूजा केली तर आम्हाला बकरी ईद साजरी करण्याची परवानगी देणार का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. तसेच या प्रकरणात प्राचार्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी शिक्षणमंत्र्यांकडे करणार असल्याचे त्याने सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 24, 2018 2:17 pm