देशात आणि राज्यात असलेल्या भाजप सरकार शेतकरी, कारखानदाराच्या विरोधात निर्णय घेताना अनेक घटनांमधून पाहण्यास मिळत आहे. यामुळे अनेकांच्या हातचा रोजगार गेला असून बेरोजगारांचे प्रमाण वाढले आहे. या घटनांमध्ये आता खडकीतील ऑर्डीनन्स फॅक्टरीचं सरकार खासगीकरण करीत आहे. या निर्णयाचा आम्ही निषेध करीत आहोत. यातून सरकार उद्योजकांचे हितसंबंध जपत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला. हे सरकार शेतकरी आणि कामगार विरोधी आहे. सरकार मंदीवर उपाययोजनास करण्याऐवजी भावनिक राजकारण करत असल्याचा आरोपदेखील त्यांनी यावेळी केला.

पुण्यातील खडकीतील ऑर्डनन्स फॅक्टरीच्या कामगारांच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे पुण्यात आले होते. यावेळी कामगारा समवेत त्यांनी संवाद साधला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी अनेक विषयावर भूमिका त्यांनी मांडली. यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले की, “सरकार साम, दाम, दंड आणि भेद या नीतीचा अवलंब करून नेत्यांची चौकशी करीत आहे. हे लोकशाहीला घातक असून हे आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर समोर ठेऊन सरकार असे करीत आहे,” असेही ते यावेळी म्हणाले.

“राज्यात आमच्या सरकारच्या काळातदेखील पूरपरिस्थिती हाताळली. पण मुख्यमंत्र्यांसह सरकारमधील मंत्र्यांची जल्लोष यात्रा सुरू होती. लाखो नागरिक पुराच्या पाण्यात असतानाही त्यांची ही केली. सरकारला या परिस्थितीचे गांभीर्य ओळखता आले नाही, असेही ते यावेळी म्हणाले. सरकारने राज्यातील जनतेची माफी मागावी, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.