26 September 2020

News Flash

काँग्रेसजनच म्हणतात ‘त्या’ नेत्यांना धडा शिकवा

महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने शहर काँग्रेसमध्ये सातत्याने गोंधळाचे चित्र दिसत आहे.

काँग्रेस कार्यकर्त्यांवर शहर नेतृत्वाने लादलेली राष्ट्रवादीबरोबरची आघाडी, काही प्रभागांत आघाडी तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती ही नेतृत्वाची दुहेरी चाल, आयत्यावेळी उमेदवारी यादीतून कट केलेली निष्ठावंतांची नावे आदी कारणांमुळे आता निष्ठावंत काँग्रेसजनांकडूनच शहर नेतृत्वाच्या विरोधात दंड थोपटण्यात आले आहेत. ‘निष्ठा आणि त्यागाची प्रतिके असलेल्या पक्षाच्या नेत्यांच्या विचारांना तिलांजली देणाऱ्यांना धडा शिकवा,’ असा जाहीर प्रचारच काँग्रेसजनांकडून समाजमाध्यमातून सुरू झाला आहे.

महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने शहर काँग्रेसमध्ये सातत्याने गोंधळाचे चित्र दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर काँग्रेसने आघाडी करू नये, स्वबळावरच निवडणूक लढावी, अशी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची भावना आहे. अशी जाहीर भूमिका घेतल्यानंतरही हळूहळू या भूमिकेत बदल झाला. भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी आघाडी करण्यासंदर्भात राष्ट्रवादीबरोबर चर्चा सुरू झाली. मात्र त्यात स्थानिक नेतृत्वाकडून कोणतीही ठोस भूमिका घेण्यात आली नाही. त्यामुळे आघाडीची चर्चाही लांबली आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर काँग्रेसची फरफट झाली, अशी भावना काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत.

महापालिकेची सत्ता मिळविण्यासाठी काही प्रभागात आघाडी आणि काही प्रभागात मैत्रीपूर्ण लढती हा राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या सोयीनुसार दिलेला प्रस्ताव काँग्रेसच्या शहर पदाधिकाऱ्यांनी मान्य केला. आघाडी होणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शहर काँग्रेसमध्येही त्याचे तीव्र पडसाद उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी नकोच, अशी भूमिका काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून, आजी-माजी पदाधिकाऱ्यांकडून घेण्यात आली होती. त्यासंदर्भात कधी जाहीरपणे तर कधी दबक्या आवाजात ही मागणी करण्यात येत होती. मात्र काँग्रेसमधून होत असलेल्या या मागणीकडे दुर्लक्ष करून आघाडीचा निर्णय घेण्यात आला, अशी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची तक्रार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला जागा सोडल्यानंतर काँग्रेसच्या अनेक निष्ठावंतांची तिकिटेही कापण्यात आली. त्यामुळे आता जाहीरपणे काँग्रेस नेतृत्वावर काँग्रेसजनांकडूनच टीका सुरू झाली आहे. पक्षाचे नगरसेवक आणि प्रदेश काँग्रेसचे चिटणीस संजय बालगुडे यांनाही उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर त्यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. ‘निष्ठा आणि त्यागाची शिकवण देणाऱ्या काँग्रेसच्या विचारधारेला धक्का लागला आहे. चुकीच्या पद्धतीने देण्यात आलेली तिकिटे, बाहेरून आलेल्यांना निवडणुकीच्या निमित्ताने संधी देण्यात आली. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी, लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या विचारधारांनाच पक्षाने या निर्णयाने तिलांजली दिली आहे. त्यामुळे नेत्यांच्या विचारांना तिलांजली देणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा,’ असे जाहीर आवाहन समाजमाध्यमातून बालगुडे यांनी केले आहे. नेतृत्वावरील या आगपाखडीमुळे शहर काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूसही पुढे आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2017 4:00 am

Web Title: pune congress internal issue
Next Stories
1 माजी सभागृह नेत्याच्या विरोधात शिवसेनेकडून भोसले
2 ‘जातीयवाद्यांना’ रोखण्यासाठी पुण्यात आघाडी
3 पुण्यात शिका, राजस्थानात परीक्षा द्या
Just Now!
X