रस्त्यावरचे खड्डे या विषयावर अनेकदा आंदोलनं, टीका होतच असतात. मुंबईच्या खड्ड्यांवर आरजे मलिष्काने तर चक्क विडंबन गीतच तयार केलं होतं. आज पुण्यात काँग्रेसनेही याच प्रश्नासंदर्भात एक अनोखं आंदोलन केलं आहे. काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते चक्क या खड्ड्यांमध्ये विटी-दांडू खेळले.

पुणे शहरातील अनेक रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यावर पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपकडून खड्डे बुजवले जात नाही. त्याच्या निषेधार्थ आज टिळक स्मारक समोरील रस्त्यावरील खड्ड्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून विट्टी दांडू आणि गोट्या खेळून आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा – पुणे : फिरता रहूं दर बदर गाण्यावर हातात बंदूक घेऊन शेतात शूट केला व्हिडीओ अन्…

या आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेस पक्षाचे नेते संजय बालगुडे यांनी केले. यावेळी ते म्हणाले की, प्रत्येक वर्षी पुणेकरांना पावसाळ्यात खड्ड्यांच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. महापालिकेतील सत्ताधारी भाजपाकडून कोणत्याही प्रकारच्या उपाय योजना केल्या जात नाही. ही निषेधाची बाब असून आम्ही आजवर अनेक वेळा आंदोलन केले आहे. मात्र महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने दखल घेतली नाही. आता आम्ही भाजपाचे पुण्याचे खासदार गिरीश बापट आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांना चष्मा भेट देणार आहोत. त्यामधून शहरातील रस्ते पहावेत, असे आवाहन करणार आहोत.

आंदोलन ठिकाणावरील खड्डे बुजवले

काँग्रेस पक्षाकडून टिळक रोडवर आज सकाळी खड्यांच्या प्रश्नावर विट्टी दांडू आणि गोट्या खेळून आंदोलन केले जाणार असा मेसेज काल पासून सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्या आंदोलनाची महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने धास्ती घेऊन काँग्रेस पक्षाचे आंदोलन फेल ठरावे, या उद्देशाने रातोरात बहुतांश खड्डे बुजविण्यात आले. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना रस्त्याच्या कडेला असलेल्या छोट्याशा खड्ड्यात विट्टी दांडू आणि गोट्या खेळून आंदोलन करावे लागले.