‘कपल चॅलेंज’मुळे गैरप्रकाराची शक्यता; सायबर पोलिसांचा इशारा

पुणे : गेल्या तीन ते चार दिवसांपासून समाजमाध्यमावर ‘कपल चॅलेंज’च्या नावाखाली दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत.  ‘कपल चॅलेंज’चे आव्हान स्वीकारल्यानंतर टाकण्यात आलेल्या छायाचित्रांचा गैरवापर करून नाहक त्रासाला सामोरे जाण्याची शक्यता सायबर पोलिसांनी व्यक्त केली आहे. समाजमाध्यमावर प्रसारित करण्यात आलेल्या छायाचित्रांचा गैरवापरही होण्याची शक्यता आहे, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

‘कपल चॅलेंज’च्या नावाखाली दाम्पत्यांकडून छायाचित्रे टाकण्याची गेल्या तीन ते चार दिवसांपासून चढाओढ लागली आहे. अगदी उच्चशिक्षितांपासून सामान्य नागरिकांपर्यंत सर्वजण स्वत:ची आणि पत्नीची एकत्र छायाचित्रे समाजमाध्यमावर प्रसारित करत आहेत.  ‘कपल चॅलेंज’ स्वीकारले असे शीर्षक छायाचित्रावर ठेवण्यात येत आहे. या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर पोलिसांनी एक ट्विट जारी केले आहे. समाजमाध्यमावर टाकण्यात आलेल्या छायाचित्रांचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागेल तसेच फसवणुकीची शक्यता नाकारता येत नाही, असा इशारा पोलिसांनी ट्विटद्वारे दिला आहे.

नटूनथटून काढलेली छायाचित्रे दाम्पत्यांकडून टाकली जात आहेत. घरगुती समारंभ, सहलीला गेल्यानंतर काढलेली छायाचित्रे प्रसारित करण्यात येत आहेत. यापूर्वी सायबर गुन्हेगारांनी समाजमाध्यमावर प्रसारित केलेल्या छायाचित्रांचा गैरवापर केल्याची शेकडो उदाहरणे डोळ्यासमोर असताना सामान्यजन कोणताही विचार न करता अशा प्रकारची छायाचित्रे प्रसारित करत आहेत. बऱ्याचदा सायबर गुन्हेगारांकडून महिलांच्या छायाचित्रांमध्ये फे रफार करून ती अश्लील संकेतस्थळांवर टाकण्यात आली असल्याचे प्रकार घडले आहेत. अशी छायाचित्रे प्रसारित केल्यानंतर नाहक त्रास होईल,शिवाय कौटुंबिक ताणतणावाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे अशा प्रकारची छायाचित्रे कृपया प्रसारित करू नका, असे आवाहन करण्यात आले आहे.

गैरप्रकार कसे घडतात?

सायबर गुन्हेगार महिला, युवतींच्या छायाचित्रात फेरफार (मॉर्फिग) करतात. अशा प्रकारची छायाचित्रे अश्लील संकेतस्थळांवर प्रसारित केली जातात. छायाचित्रांवर महिला किंवा युवतीचा मोबाइल क्रमांक देखील दिला जातो. काही घटनांमध्ये एखाद्या कुटुंबाला त्रास देणे किंवा एकतर्फी प्रेमातून अश्लील छायाचित्रे प्रसारित करण्यात आल्याचे प्रकार यापूर्वी घडले होते. त्यामुळे कृपया स्वत:ची वैयक्तिक माहिती तसेच छायाचित्रे समाजमाध्यमावर प्रसारित करू नये. गैरप्रकार झाल्यास नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागेल, असे सायबर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांनी सांगितले.