करोनाचा उद्रेक झाल्यानंतर पुण्यात तातडीने निर्बंध लागू करण्यात आले होते. जवळपास दीड ते दोन महिन्यांनंतर पुण्यातील निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, निर्बंध शिथिल होताच पुण्यातील रस्त्यांवर आणि बाजारपेठांमध्ये लोकांची वर्दळ वाढली आहे. खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत असल्याचं दिसत आहे. पुण्यातील वाढत्या गर्दीवर चिंता व्यक्त करत उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना आवाहन केलं.

पु्ण्यात अजित पवारांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. लॉकडाउनचे निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आल्यामुळे पुण्यात पुन्हा गर्दी होत असल्याचं दिसत आहे. यावर अजित पवारांनी चिंता व्यक्त केली. अजित पवार म्हणाले, “गर्दी झाली तर काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. व्यापाऱ्यांना देखील विनंती आहे, त्याबद्दल लक्ष द्यावे. अन्यथा आणखी कठोर निर्णय घेण्यास लावू नका. लोक कंटाळली आहेत. लोकांची कामे रखडली आहेत, त्यामुळे बाहेर पडत आहेत. पण करोना संकट दूर झालेलं नाही. जर गर्दी वाढत राहिली, तर एका बाजूची आज आणि दुसर्‍या बाजूची उद्या अशा पद्धतीने दुकाने सुरू करण्याची वेळ आणू नका. त्यासाठी नागरिकांनी गर्दी करू नये. बाहेर पडताना, नियमांचे पालन करावं,” असं आवाहन अजित पवार यांनी केलं.

संबंधित बातमी – Pune Unlock : मनपाकडून नवीन आदेश जाहीर ; सर्व दुकाने ४ वाजेपर्यंत सुरू राहणार

“पेट्रोल-डिझेलचे दर १०० रूपयांच्यावर पोहोचले आहेत. त्यामुळे राज्य सरकारकडे कर कमी करण्याची मागणी होत आहे, परंतु गेल्या वर्षांपासून आपण करोनाशी लढत आहोत. त्यामुळे करामध्ये कपात करता येणार नाही. केंद्राची परिस्थिती आता चांगली आहे,” असं सांगत त्यांनी पेट्रोलवर दर कपातीचा निर्णय केंद्राकडे टोलावला.

हेही वाचा – “स्थानिक पातळीवर राजकारण होत असतं, कुरघोड्या करत असतात पण…”; संजय राऊतांचा राष्ट्रवादीला सूचक इशारा

संजय राऊतांच्या विधानावर मांडली भूमिका

पुणे महापालिका निवडणुकीत शिवसेना ८० जागा जिंकेल. किंग किंवा किंग मेकर असू, असं शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत म्हणाले होते. त्यावरही अजित पवार यांनी भूमिका मांडली. “प्रत्येकजण पक्ष वाढविण्याच्या दृष्टीने भूमिका मांडत असतात. त्यातून त्यांनी मांडली असावी. आगामी महापालिकेत प्रभाग २,३ की ४ करिता अनुकूल आहात का, त्यावर ते म्हणाले की, “सध्याच्या स्थितीला मी तरी २ करिता अनुकूल आहे,” अशी माहिती पवार यांनी दिली.