१५ महिन्यांत सात हजार २०० बाकांसाठी चार कोटींचा खर्च

पुणे : अंदाजपत्रकात नगरसेवकांना मिळत असलेल्या निधीतून प्रभागात बाक बसविण्याचा सर्वपक्षीय नगरसेवकांचा ‘उद्योग’ टीकेनंतरही कायम राहिल्याचेच चित्र आहे. गेल्या १५ महिन्यात चार कोटी रुपये खर्च करून शहराच्या विविध भागात तब्बल सात हजार २०२ बाके बसविण्यात आल्याचे वास्तव महापालिकेनेच दिलेल्या आकडेवारीतून पुढे आले आहे. त्यामुळे नगरसेवकांची विकासकामांची धाव बाक बसविण्यापर्यंतच मर्यादित असल्याचेही स्पष्ट होत आहे.

नागरिकांच्या कररूपातून जमा झालेल्या पैशातून सर्वपक्षीय नगरसेवक प्रभागात विकासकामांच्या नावाखाली बाक बसवित असल्याचे चित्र सातत्याने पुढे आले आहे. नागरिकांची मागणी नसतानाही अनेक ठिकाणी बाक बसविण्याची किमया नगरसेवकांनी केली आहे. अगदी खासगी सोसायटय़ांच्या आवारातही बाक बसविण्यात आल्याची वस्तुस्थिती आहे. त्यावरून स्वयंसेवी संस्थांकडून सातत्याने टीका होत असतानाही बाक बसविण्याचे काम नगरसेवकांच्या आवडीचे असल्याचे दिसून येत आहे. त्यातही स्मार्ट सिटी म्हणून विकसित होत असलेल्या औंध-बाणेर-बालेवाडी भागात सर्वाधिक बाक  बसविण्यात आले आहेत.

प्रभागात बसविण्यात आलेले बाक, त्यावर झालेला खर्च याची माहिती महापालिकेकडे मुख्य सभेतील प्रश्नोत्तरात मागविण्यात आली होती. त्यामध्ये ही माहिती लेखी स्वरूपात महापालिकेने दिली आहे.

सर्वपक्षीय नगरसेवकांच्या मागणीनुसार जुलै २०१८ ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत चार कोटी दोन लाख रुपये खर्च करून सात हजार २०२ बाक बसविण्यात आले आहेत. बाणेर, बालेवाडी, पाषाण या परिसरात सर्वाधिक ९२६ बाक बसविण्यात आले आहेत. नगरसेवकांबरोबरच आमदारांकडूनही बाक बसविण्यात आले आहेत, असे उत्तर महापालिकेकडून देण्यात आले आहे. नगरसेवकांनी अंदाजपत्रकात असलेल्या निधीतून (सभासद यादी- स यादी) बाक बसविले आहेत.

कापडी पिशव्यांचे वाटप, तसेच ओला-सुका कचऱ्याच्या वर्गीकरणासाठी कचरा डब्यांचे वितरण नगरसेवकांकडून केले जाते. वस्तू वाटपात मोठय़ा प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्यामुळे वस्तू वाटपावर र्निबध आणण्यात आले आहेत. त्यानुसार वर्षभरासाठी एका नगरसेवकाला या कामांसाठी जास्तीत जास्त १० लाख रुपयेच खर्च करता येणार आहेत. मात्र कचरा डबे, पिशव्यांचे वाटप वादग्रस्त ठरत असल्यामुळे आता बाक बसविण्यात येत असल्याचेही आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

नगरसेवकाने प्रभागात किती बाक बसवावेत, यासंदर्भात ठोस धोरण नाही. बाकांच्या संख्येवरही नियंत्रण नाही. त्यात चार सदस्यांचा प्रभाग असल्यामुळे प्रभागातील चारही नगरसेवकांकडून बाक बसविण्याची मागणी भांडार विभागाकडे होत आहे. त्यातून खासगी सोसायटय़ांमध्येही बाक बसविण्यात आल्याची वस्तुस्थिती आहे.

बाकांची संख्या जास्त असलेली ठिकाणे

९२६ बाणेर-बालेवाडी-पाषाण

५५१ कर्वे नगर

४४१ मयूर कॉलनी- डहाणूकर कॉलनी

४३५ अप्पर-सुपर इंदिरानगर-

३६३ शनिवार पेठ-सदाशिव पेठ

३३८ डेक्कन जिमखाना-मॉडेल कॉलनी

 

नगरसेविका वर्षां साठे आघाडीवर

वैयक्तिक पातळीवर सर्वाधिक बाक बसविण्यात भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका वर्षां साठे आघाडीवर आहेत. त्यांनी अप्पर-सुपर इंदिरानगर प्रभागात सर्वाधिक ३२५ बाक बसविले आहेत. त्यानंतर बाणेर-बालेवाडी-पाषाण भागासाठी उषा कळमकर यांनी ३२० बाक बसवले असून शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाचे आमदार, नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे यांनी २५३ बाक बसविल्याची नोंद महापालिकेकडे आहे.