X

पुणे: १३ महिन्याच्या बाळाला दुर्मिळ आजार, १६ कोटींच्या इंजेक्शनची गरज; दांपत्याची मदतीसाठी आर्त हाक

"मोदीसाहेब माझ्या बाळाला वाचवा"

पुण्यात राहणाऱ्या अमित आणि रूपाली रामटेककर हे दांपत्य सध्या आपल्या मुलाला वैद्यकीय मदत मिळावी यासाठी अथक प्रयत्न करत आहे. १३ महिन्यांच्या युवानला स्पायनल मस्कुलर एट्रॉफी टाईप १ हा दुर्मिळ आजार झाला आहे. त्याच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णलयात उपचार सुरू असून या आजारावर थेट अमेरिकेतून १६ कोटी रुपयांचे इंजेक्शन आणावे लागणार आहे. त्यानंतर बाळाची प्रकृती सुधारणार आहे.

रामटेककर हे सर्वसामान्य कुटुंबातील असल्याने त्यांना १६ कोटींची रक्कम जमावणं अशक्य आहे. त्यामुळे आता त्यांनी क्राउडफंडिंग मार्ग अवलंबला आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच मदतीसाठी पुढे येत असतात. आता माझ्या बाळालादेखील त्यांनी मदत करावी. माझं बाळ इतर मुलांप्रमाणे ठणठणीत झालं पाहिजे. मोदीसाहेब माझ्या बाळाला वाचवा,” अशी आर्त हाक या बाळाच्या आई रूपाली रामटेककर यांनी घातली आहे.

लोकसत्ता डॉट कॉमने रूपाली आणि अमित रामटेककर यांच्याशी संवाद साधून अधिक माहिती जाणून घेतली असता त्यांनी सांगितलं की, “युवानचा जन्म झाल्यानंतर काही दिवसांनी त्याची मान धरत नव्हती. दुध गिळणं यासह अनेक त्रास होऊ लागले. त्यामुळे आम्ही त्याला दवाखान्यात नेलं, काही तपासण्यादेखील केल्या. डॉक्टर म्हणाले हळूहळू तो बरा होईल. मात्र त्याचा त्रास वाढतच होता. यामुळे पुढे जाऊन आणखी तपासण्या करण्यास सांगितल्या. यावेळी त्याला स्पायनल मस्कुलर एट्रॉफी हा एक दुर्मिळ आजार झाला असल्याचं निष्पन्न झालं. युवानला बरं करण्यासाठी बाहेरच्या देशातून इंजेक्शन आणावे लागेल हा एकच उपाय असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या इंजेक्शनची किंमत जवळपास १६ कोटी रुपये असल्याचं सांगितल्यानंतर आम्ही सर्व सुन्न झालो. आपल्याकडे एवढी मोठी रक्कम केव्हा जमा होणार असं वाटू लागलं. मग आम्ही क्राउडफंडिंग हा मार्ग अवलंबला असून जवळपास 25 दिवस होत आले आहेत. यामध्ये 23 लाख रुपये जमा झालेत. नागरिकांनी आम्हाला मदत करावी. आमच्या बाळाला वाचवा. एक हात मदतीसाठी पुढे करावा. आमच्या बाळाचा दुसरा वाढदिवस आनंदाने साजरा व्हवा एवढीच इछा आहे”.

“समाजात अनेक दानशूर लोक आहेत. त्यांनी पुढे यावं आणि मदतीचा हात पुढे करावा. त्याहीपेक्षा राजकीय नेते, सेलिब्रिटी, खेळाडू, उद्योगपती या सर्वांनी माझ्या बाळासाठी एक हात मदतीचा पुढे करावा,” असं आवाहन त्यांनी केलं आहे.

अशा दुर्मिळ आजारावरील इंजेक्शनयचे संशोधन करण्याची गरज : अमित रामटेककर
“आज आमच्या बाळाला हा दुर्मिळ आजार झाला आहे. हे इंजेक्शन परदेशात मिळतं आणि खूप महाग आहे. हा आजार कोणाला होईल हे सांगू शकत नाही. त्याची रक्कम तर 16 कोटी रुपये असून त्यामुळे सरकारने अशा आजारांवर संशोधन करून आपल्या देशात याचे कसे तयार करता येईल याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं,” अमित रामटेककर यांनी सांगितले.

24
READ IN APP
X