करोना विषाणूनं महाराष्ट्रातील जनतेबरोबर आरोग्य व्यवस्थेलाही वेठीस धरलं आहे. दुसऱ्या लाटेनं थैमान घातल्यानंतर आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड तणाव आला असून, यातूनच काही चुकीच्या घटनाही घडत असल्याचं वारंवार समोर येत आहे. काही ठिकाणी कोविड रुग्णांच्या मृतदेहांची आदलाबदल झाल्याचे प्रकारही घडले असून, अशीच एक घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील औंध येथील शासकीय रुग्णालयात कुटुंबियांना दुसऱ्याच रुग्णाचा मृतदेह देण्यात आला. कुटुंबियांनी याप्रकरणी तक्रार केल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील आठवड्यात ९० वर्षीय रखमाबाई जाधव यांची प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे तपासणी करण्यात आल्यानंतर त्यांना करोनाचा संसर्ग झालं असल्याचं निष्पन्न झालं. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ही माहिती कळाल्यानंतर रखमाबाई यांचा मुलगा दीपक आणि सून माया हे दुसऱ्या दिवशी रुग्णालयात गेले होते. तिथे गेल्यानंतर त्यांच्याकडे रखमाबाई यांचा मृतदेह सोपवण्यात आला. मात्र, मृतदेह दुसऱ्याच व्यक्तीचा असल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांना धक्काच बसला.

रखमाबाई यांचा मृत्यू झाला, त्याच रात्री आणखी एका वयोवृद्ध महिलेचाही करोनामुळे मृत्यू झाला होता. दोघींचे मृतदेह शवागारातील एकाच शीतपेटीत ठेवण्यात आले होते. दुसऱ्या महिलेचा मृतदेह कुटुंबियांना सोपवताना मृतदेहाची ओळक पटवण्यात आली होती, असं रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितलं.

दुसरीकडे जिने मला चालायला शिकवलं, माझं संपूर्ण बालपण तिच्यासोबत गेलं, असं असताना आपल्याच आईला ओळखण्यात माझी चूक कशी होऊ शकते,’ असा सवाल दीपक यांनी उपस्थित केला आहे. याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाने आता चौकशीचे आदेश दिले आहेत. याप्रकरणात दोषी आढळणाऱ्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असं आश्वासनही प्रशासनाने रखमाबाई यांच्या कुटुंबियांना दिलं आहे. रखमाबाई यांच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी प्रशासनाने आता डीएनए चाचणी आणि बोटांचे ठसेही घेतले आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune covid19 update covid 19 patient wrong body aundh district government hospital administration has ordered an inquiry bmh
First published on: 12-04-2021 at 09:35 IST