बेकायदेशीर रीत्या देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला गुन्हे शाखेच्या संघटित गुन्हेगारीविरोधी पथकाने पकडले. त्याच्याकडून पिस्तूल आणि एक काडतूस जप्त करण्यात आले. पिंपरीतील संत तुकारामनगर येथे ही कारवाई करण्यात आली.

मुकेश ओमप्रकाश मगोत्रा (वय २६, रा. संत तुकारामनगर, पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा मित्र चेतन विश्वकर्मा (सध्या रा. पिंपरी, मूळ रा. त्रिलोकनगर, इटावा, मध्य प्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुकेश याने चेतन याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल विकत घेतले होते. चेतन याने मध्य प्रदेशातून पिस्तूल विक्री करण्यासाठी आणले होते. मुकेश पिस्तूल घेऊन एच.ए.कंपनीच्या मैदानानजीक येणार असल्याची माहिती मंगळवारी पोलीस शिपाई सचिन जाधव यांना मिळाली. त्या आधारे सापळा रचून मुकेश याला पकडण्यात आले.

मुकेश याच्याविरुद्ध यापूर्वी पिंपरी पोलीस ठाण्यात एकाला मारहाण करण्याचा गुन्हा दाखल झाला होता. पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड, सहायक निरीक्षक रणजित भोईटे, उपनिरीक्षक पोपटराव गायकवाड, सचिन जाधव, नाना जगताप, अब्दुल सय्यद, कांता बनसुडे, शैलेश नाईक, मयूर शिंदे, शीतल शिंदे यांनी ही कारवाई केली.

साडेपाच लाखांचा ऐवज लंपास

सदनिकेचा दरवाजा तोडून चोरटय़ांनी कपाटातील पावणेतीन लाखांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा पाच लाख ६२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. स्वारगेट परिसरातील पारसनीस कॉलनीत ही घटना घडली.

उमेश चोरडिया  यांनी यासंदर्भात पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गेल्या महिन्यात ३० मे रोजी चोरडिया कुटुंबीय हे बाहेरगावी गेले होते. चोरटय़ांनी त्यांच्या सदनिकेचे कुलूप तोडले. कपाटातील दागिने आणि रोकड असा पाच लाख ६२ हजारांचा ऐवज चोरला. पोलीस उपनिरीक्षक डोके तपास करीत आहेत.