िपपरीतील गुलाब पुष्प उद्यानातील सुरक्षारक्षकास परिसरातील झोपडपट्टीतील काही तरुणांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. सात-आठ जणांच्या या टोळक्याने एकटा सापडलेल्या या सुरक्षारक्षकास मोठमोठे दगड फेकून मारले आणि कमरेचे पट्टे काढून त्यास मारहाण केली आहे. याप्रकरणी महापालिकेच्या वतीने पोलिसांकडे तक्रार करण्यात आली.

पंढरीनाथ चौरे (वय ५२, रा. नेहरूनगर) असे या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. दुपारी बारा ते सायंकाळी आठ ही त्यांची कामाची वेळ आहे. बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास उद्यानाच्या आवारात असलेल्या महापालिकेच्या मालकीच्या विहिरीत काही जण पोहत असल्याची माहिती चौरे यांना मिळाली. तेथे जाऊन त्यांनी या तरुणांना हटकले, तेव्हा काही जण पळून गेले. तर दारू प्यायलेल्या दोन जणांनी मात्र त्यांना मारहाण केली. खाली पडलेले दगड फेकून मारले. जाता जाता कमरेचे पट्टे काढून त्यानेही मारले. या प्रकाराची माहिती चौरे यांनी वरिष्ठांना दिल्यानंतर पोलीस तक्रार करण्यात आली. हे तरुण परिसरातील झोपडपट्टीमध्ये राहणारे आहेत. त्यानुसार पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. यापूर्वीही अशाप्रकारे सुरक्षारक्षकांना मारहाण होण्याच्या घटना घडल्या आहेत. दोनच दिवसांपूर्वी उद्यानाच्या आवारात तलवार आणि सुरे लपवून ठेवले होते.