समाजामध्ये एकोपा वाढावा आणि नागरिकांमध्ये संघभावना जागृत व्हावी, हा गणेशोत्सव सुरू करण्यामागचा उद्देश स्वातंत्र्योत्तर काळात सफल झाला. विविध जाती-धर्माचे नागरिक गणेशोत्सवामुळे एकत्र आले. सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून विधायक कार्यामध्ये आपलाही खारीचा वाटा गणेश मंडळे उचलू लागली. मात्र, गेल्या काही वर्षांत गणेशोत्सवाच्या कालखंडात गुन्हेगारी आणि भाईगिरीचे प्रमाण वाढत असल्याचा आलेख दिसून येतो.

स्वातंत्र्यप्राप्तीसाठी नागरिकांचे संघटन करावे, देवकार्याच्या माध्यमातून देशकार्याची मुहूर्तमेढ रोवली जावी, या उद्देशातून लोकमान्य टिळक यांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले. गणेशोत्सवाचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे होत असताना या उत्सवाने स्वराज्याचे सुराज्य करण्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. मात्र, माणसांमधील अपप्रवृत्ती काही प्रमाणात उत्सवामध्ये सक्रिय झाल्यामुळे गणेशोत्सवाला गालबोट लागत आहे. कार्यकर्त्यांची फौज आणि राजकीय नेतृत्व घडविणारी कार्यशाळा असे गणेशोत्सवाचे वर्णन केले जाते. एकेकाळी मंडप उभारणी, वर्गणी गोळा करण्यापासून ते पौराणिक-ऐतिहासिक, वैज्ञानिक देखावा आणि विद्युत रोषणाई साकारण्यासाठी कार्यकर्ते रात्र जागून काढत. देखावे पाहण्यास येणाऱ्या नागरिकांना शिस्तीमध्ये आनंद लुटण्यासाठी झटणारे कार्यकर्ते तहान-भूक विसरून काम करायचे. महिलांशी असभ्य वर्तन करणाऱ्या टिंगलखोरांशी प्रसंगी दोन हात करून त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यामध्येही ते अग्रभागी असायचे. एकेकाळी अशा टिंगलखोरांची नावे ही सडक सख्याहरी म्हणून प्रसिद्ध होत असत.

आता काय?

सामाजिक सलोख्यासाठी सुरू झालेल्या उत्सवाची वाटचाल अलिकडच्या काळात गुन्हेगारी आणि पर्यायाने लोकांनाच उत्सवापासून दूर नेणारी झाली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे ‘प्रेशर ग्रुप’ म्हणून उदयाला आली आहेत. मात्र हा दबाव सामाजिक भूमिकेसाठी अभावानेच वापरला जातो. उत्सव सुरू होण्याच्या आधीपासून वर्गणी मिळवण्यासाठी व्यापारी, रहिवाशांना धमकावण्यानेच उत्सवाची सुरुवात गेले अनेक वर्षे होताना दिसते. राजकीय विरोधकांच्या मंडळांमध्ये काही वेळा होणारे वाद या सगळ्यातून उत्सवाचा व्यवस्थेवरील ताण गेल्या काही वर्षांमध्ये वाढल्याचे समोर येते. मंडप उभारण्यासाठी परवानगी घेणे, ध्वनिप्रदूषणाचे नियम या सगळ्याचे सर्रास उल्लंघन मंडळांकडून केले जाते. परिसरातील तरुण सार्वजनिक मंडळाच्या छताखाली एकत्र येतात. एकत्र आलेला मतदार वर्ग आणि वेळप्रसंगी ‘उपयोगी’ पडणारे कार्यकर्ते स्थानिक राजकीय नेत्यांकडून जपले जातात. त्यामुळे मंडळांकडून मोडीत निघणाऱ्या नियमांकडे कानाडोळा केला जात असल्याचे समोर येते आहे. किंबहुना गणेशोत्सव हे होतकरू दादा, भाई, नेते यांच्या राजकीय शक्तिप्रदर्शनाचे हक्काचे व्यासपीठ झाल्याचे दिसते. त्यामुळे उत्सवाच्या काळातील गुन्हेगारीही वाढत असल्याचे दिसते आहे. अवघ्या दोन-चार वर्षांपूर्वीच दोन मंडळांमधील मारामारी, रस्त्यावरील वाहनांची तोडफोड असे प्रकार घडले होते. गेल्याच वर्षी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वर्गणीसाठी व्यापाऱ्यांना मारण्याचे प्रकारही समोर आले होते. याशिवाय उत्सवाबाबत आता बहुतेककरून बघ्याच्या भूमिकेत असलेल्या सामान्य नागरिकालाही याचा फटका बसू लागला आहे. मिरवणुकीदरम्यान मोबाइल चोरीचे प्रकार मोठय़ा प्रमाणावर वाढले आहेत. गेल्या वर्षी मोबाइल चोरीच्या जवळपास २ हजार तक्रारींची नोंद झाली होती. मुलींची छेडछाड, सर्व शहर आणि व्यवस्था शहराच्या मध्यभागी एकवटलेली असताना उपनगरे आणि परिसरांमध्ये झालेले चोऱ्यांचे प्रकार यांचे गालबोट आता गणेशोत्सवाला लागलेले आहे.