News Flash

प्रकार अनेक, तक्रार मात्र एकच

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी २१ फेब्रुवारी रोजी मतदान झाले.

बोगस मतदानप्रकरणी संगणक अभियंत्याच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

महापालिका निवडणुकीत बोगस मतदानाचे प्रकार अनेक मतदान केंद्रांवर घडले. मात्र, त्याच्या तक्रारी पोलिसांपर्यंत आल्या नाहीत. किंबहुना ज्यांच्या नावाने बोगस मतदान करण्यात आले, अशा व्यक्तीही तक्रार देण्यास पुढे आल्या नाहीत. तक्रार दिल्यास नाहक मनस्ताप सोसावा लागेल. या मानसिकतेतून अनेकांनी तक्रारी दिल्या नसाव्यात. मार्केट यार्ड भागात एका संगणक अभियंत्याच्या नावाने दुसऱ्याच व्यक्तीने मतदान केले. त्यानंतर संगणक अभियंत्याने पाठपुरावा करून त्याच्या नावाने मतदान करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कायदेशीर तक्रार देऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी २१ फेब्रुवारी रोजी मतदान झाले. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक प्रभागांत यंदा मतदानाचा टक्का वाढल्याचे दिसून आले. प्रभागनिहाय मतदानाची आकडेवारी पाहता अनेक ठिकाणी मतदानाची टक्केवारी पन्नास टक्क्यांच्या पुढे गेल्याचे दिसून आले. निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशिनचा वापर सुरू झाल्यानंतर बोगस मतदानाच्या प्रकारांना बऱ्याच प्रमाणात चाप बसला. निवडणुकीत मतदानपत्रिकेचा वापर सुरू असताना बोगस मतदानाचे प्रमाण जास्त होते. ईव्हीएम मशिनचा वापर सुरू झाल्यानंतर बोगस मतदानाचे प्रमाण कमी झाले असले तरी बोगस मतदानाच्या घटना घडल्या नाहीत, असा अर्थ काढता कामा नये, असे एका पोलीस अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले.

मतदानाच्या दिवशी मार्केट यार्ड भागातील गंगाधाम सोसायटीतील रहिवासी दिनेश अग्रवाल (वय ४५) हे बिबवेवाडी रस्त्यावरील पंचदीप भवन येथील मतदान केंद्रात मतदान करण्यासाठी गेले होते. अग्रवाल हे एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत अभियंता आहेत. दुपारी सव्वाबाराच्या सुमारास ते मतदान केंद्रावर पोहोचले. मतदार यादीची पाहणी करण्यात आली. तेव्हा दिनेश यांच्या नावाने दुसऱ्या एका व्यक्तीने मतदान केल्याचे निदर्शनास आले. दिनेश यांच्या नावाने मतदान करणाऱ्या व्यक्तीचे नावदेखील अग्रवाल होते. दरम्यान, मतदानाचा हक्क बजावू न शकल्याने दिनेश यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. मतदानाच्या हक्कापासून मला वंचित ठेवू नका, असे त्यांनी बजावून सांगितले. अखेर निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून फॉर्म भरून घेतला. त्यानंतर दिनेश यांनी मतदानाचा हक्क बजावला, अशी माहिती मार्केट यार्ड पोलिसांनी दिली.

दरम्यान, आपल्या नावाने दुसऱ्याच एका व्यक्तीने मतदान केल्याने दिनेश यांनी त्या व्यक्तीविरोधात तक्रार देण्याचा निर्णय घेतला. दोन दिवसांपूर्वी दिनेश मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात गेले. त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट दिली. बोगस मतदानाची तक्रार त्यांनी पोलिसांकडे दिली. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र होनराव तपास करत आहेत.

पाठपुरावा यशस्वी

महापालिका निवडणुकीत अनेक प्रभागांत बोगस मतदान झाले. मात्र, बोगस मतदानाच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या नाहीत. ज्यांच्या नावाने बोगस मतदान करण्यात आले, त्यांनी तक्रारी दिल्या नाहीत. मात्र, संगणक अभियंता दिनेश अग्रवाल हे अपवाद ठरले. आपल्या नावाने मतदान करणाऱ्या व्यक्तीविरोधात तक्रार देण्यावर दिनेश ठाम राहिले. त्यांनी पाठपुरावा करून तक्रार दिली. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात बोगस मतदानाच्या शेकडो घटना घडल्या असण्याची शक्यता आहे. बोगस मतदानाची पोलीस दफ्तरी फक्त एकच तक्रार दाखल झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2017 2:39 am

Web Title: pune crime bogus voting
Next Stories
1 खाऊखुशाल : वडोबा
2 राज्य नाट्य स्पर्धेत ‘अग्निदिव्य’ नाटक सादर करताना सागर चौघुले या कलाकाराचा मृत्यू
3 पिंपरीत सात हजारांची लाच घेताना महिला तलाठी जाळ्यात
Just Now!
X