News Flash

व्यावसायिकाला लुबाडले

एका व्यावसायिकाने या संदर्भात डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

व्यावसायिकाला लुबाडले

कच्चा माल देण्याच्या आमिषाने पुण्यातील एका व्यावसायिकाला राजस्थानात नेऊन त्याला लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. यापूर्वी डेक्कन भागातील एका व्यावसायिकाला कच्चा माल देण्याच्या आमिषाने लुटले होते.

एका व्यावसायिकाने या संदर्भात डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार प्रमोद बलकवडे (रा. कोथरूड), समीर जोशी (रा. बावधन) चौधरी, संजू शर्मा आणि त्यांच्या पाच साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेंजहिल्स रस्त्यावरील एका सोसायटीत राहणाऱ्या २६ वर्षीय व्यावसायिकाचा प्लास्टिकपासून वस्तू तयार करण्याचा व्यवसाय आहे. त्याला पुण्यातील बलकवडे, जोशी यांनी कच्चा माल देण्याचे आमिष दाखविले होते. त्यासाठी राजस्थानात यावे लागेल, असे त्यांनी सांगितले होते.

त्यानुसार बलकवडेने ३० ऑगस्ट रोजी व्यावसायिकाला मुंबईमार्गे राजस्थानात नेले. भिवाडी गावातील एका बंगल्यात व्यावसायिकाला डांबून ठेवले. त्यानंतर बलकवडे, त्याचे साथीदारांनी त्याला पिस्तुलाचा धाक दाखविला तसेच त्याला जीवे मारण्याची धमकी दिली.

त्याची सोन्याची चेन काढून घेतली. वेगवेगळ्या बँकांच्या एटीएममधून २ लाख ६६ हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर व्यावसायिकाला पुण्याला जाण्याचे तिकिट काढून दिले.

पुण्यात परतल्यानंतर व्यावसायिकाने डेक्कन पोलिसांकडे तक्रार केली. पोलीस उपनिरीक्षक राहुल कोलंबीकर तपास करत आहेत.

 

पतीच्या छळाला कंटाळून महिलेची आत्महत्या

पुणे: पतीच्या छळाला कंटाळून महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पिंपळे सौदागर भागात घडली. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी पतीवर गुन्हा दाखल केला आहे.

अश्विनी अमृत जगताप (वय २९) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तिला आत्महत्येस प्रवत्त केल्याप्रकरणी पती अमृत राजेंद्र जगताप (वय ३३) आणि त्याच्या नातेवाइकांविरुद्ध सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अश्विनी यांचे वडील दत्तात्रय बामगुडे (वय ६५)यांनी संदर्भात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विनीचा विवाह अमृत याच्याशी सन २०१३ मध्ये झाला होता. विवाहानंतर पती, सासू आणि सासऱ्यांनी तिचा छळ सुरू केला. तसेच माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली होती. छळ असह्य़ झाल्याने तिने शनिवारी मध्यरात्री घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

 

नोकरीच्या आमिषाने लाखोंचा गंडा

पुणे: महावितरणमध्ये मुलाला नोकरी लावण्याच्या आमिषाने एकाला एक लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या भामटय़ाविरुद्ध डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अमित नलावडे (वय ४०) आणि अल्लाउद्दीन खान अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. राजाराम काळोखे (वय ५१, रा. भोसरी) यांनी यासंदर्भात डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नलावडे आणि खान तक्रारदार काळोखे यांच्या ओळखीचे आहेत. काही दिवसांपूर्वी काळोखे यांच्या मुलाला महावितरणमध्ये नोकरीला लावण्याचे आमिष दोघांनी दाखविले होते. खान आणि नलावडे यांना कर्वे रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये बोलावले. त्यांच्याकडून १ लाख १० हजार रुपये घेतले. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर काळोखे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.सहाय्यक पोलीस निरीक्षक जोशी तपास करत आहेत.

 

रुग्णालयातील लिपिकाला लाच घेताना पकडले

पुणे : वैद्यकीय बिल मंजूर करण्यासाठी रुग्णाच्या नातेवाइकाकडून १४०० रुपयांची लाच घेणाऱ्या वरिष्ठ लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. ससून रुग्णालयाच्या आवारात ही कारवाई करण्यात आली.

संजय लक्ष्मण रसाळे असे लाचखोर लिपिकाचे नाव आहे. यासंदर्भात एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारदाराची पत्नी ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती. उपचारानंतर तक्रारदाराने वैद्यकीय अधीक्षकांकडे बिल सादर केले होते. अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ लिपिक रसाळे याने तक्रारदाराकडे १४०० रुपये लाच मागितली. पैसे दिल्यास तातडीने बिल मंजूर करून देतो, असे रसाळेने तक्रारदाराला सांगितले. त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर ससून रुग्णालयाच्या आवारात सापळा लावण्यात आला. तक्रारदाराकडून लाच स्वीकारणाऱ्या रसाळेला पकडण्यात आले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 14, 2016 2:01 am

Web Title: pune crime latest news
Next Stories
1 खड्डेही पालिकेच्याच माथी
2 हत्ती गणपती, नातूबाग मंडळाचा मंडप खड्डेविरहित
3 नाटय़गृहांच्या दुरवस्थेस जबाबदार कोण?
Just Now!
X