कसबा गणपती मंदिरानजीक असलेल्या एका कुरिअर कंपनीच्या कार्यालयातील रोकड लुटून पसार झालेल्या चोरटय़ांना पोलिसांनी पकडले. चोरटय़ांकडून देशी बनावटीचे पिस्तूल, चार काडतुसे, चाकू, दुचाकी आणि ६२ हजारांची रोकड असा माल जप्त करण्यात आला.

उत्तमकुमार जसाराम माली,  भैरुलाल हरीशंकर रावल, शंभुसिंग मूलसिंग सिंदल, जितेंद्र असुसिंग राजपूत, जितेंद्र सुमेरसिंग राठोड (सर्व सध्या रा. कस्तुरे चौक, रविवार पेठ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. कसबा गणपती मंदिरानजीक एका इमारतीत असलेल्या क्विक कुरिअर कंपनीच्या कार्यालयावर दरोडा टाकून दोन लाखांची रोकड लुटून नेल्याची  घटना मंगळवारी (२२ ऑगस्ट) दुपारी घडली होती. पोलिसांकडून या गुन्ह्य़ाचा तपास करण्यात येत होता. कुरिअर कंपनीच्या कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले होते.

दक्षिण प्रादेशिक विभागाच्या दरोडा प्रतिबंधक विभागातील पोलीस हवालदार कृष्णा बढे आणि योगेश घाटगे यांना आरोपी रविवार पेठ भागातील असल्याची माहिती खबऱ्यामार्फ त मिळाली. पोलिसांनी तेथे सापळा लावून पाच जणांना पकडले. अतिरिक्त पोलीस आयुक्त रवींद्र सेनगांवकर, उपायुक्त बसवराज तेली,  सहायक आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक मोरे, उपनिरीक्षक चंद्रकांत लोहकरे, दिनेश शिंदे, बापू खुटवड, रवींद्र फुलपगारे, सचिन ढोक, प्रमोद मोहिते, अवधुत जमदाडे, मयूर शिंदे, संजय बनसोडे यांनी ही कारवाई केली.

कमी श्रमात जास्त पैसे मिळविण्यासाठी दरोडा

क्विक कुरिअर कंपनीच्या कार्यालयात मोठी रोकड असल्याची माहिती  शंभुसिंग सिंदल याला होती. त्याने साथीदारांना हाताशी धरून दरोडा टाकण्याचा कट रचल्याचे उघड झाले आहे. भैरुलाल आणि त्याचे साथीदार मूळचे राजस्थानचे आहेत. रविवार पेठ भागात  ते राहायला आहेत. कमी श्रमात जास्त पैसे मिळविण्यासाठी त्यांनी दरोडा टाकण्याचा कट रचल्याचे उघड झाले आहे.