केल्याप्रकरणी युवकाला जन्मठेप

शाळकरी मुलाचे अपहरण करुन त्याचा खून केल्याप्रकरणी विशेष न्यायाधीश  पी. सी. भगुरे यांनी युवकाला जन्मठेप आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. शाळकरी मुलाचा खून केल्यानंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास मदत केल्याप्रकरणी युवकाच्या वडिलांना न्यायालयाने तीन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. सबळ पुराव्याअभावी आरोपीच्या आईची न्यायालयाकडून निदरेष मुक्तता करण्यात आली.

वृषाल मधुकर काळाणे (वय १८,रा. भेकराईनगर, फुरसुंगी) असे जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्याचे नाव आहे. त्याचे वडील मधुकर सोपान काळाणे (वय ५५) यांना पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी न्यायालयाकडून तीन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.  या खटल्यात सबळ पुराव्याअभावी वृषालची आई नलिनी हिची न्यायालयाने निदरेष मुक्तता करण्याचे आदेश दिले. ओम अजित बनकर (वय १०, रा. भेकराईनगर, फुरसुंगी) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. त्याचे वडील अजित यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.   ओम आणि आरोपी वृषाल एकाच सोसायटीत राहायला होते. सन २७ जुलै २०१४ रोजी वृषालने ओमला त्याच्यासोबत घरात नेले. त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केला. ओमने त्याला विरोध केला. त्यानंतर वृषालने ओमचे तोंड न्हाणीघरातील पाण्याने भरलेल्या बादलीत बुडवले. यामध्ये ओमचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह पोत्यात घालून बोपदेव घाटात टाकून दिला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याच्या आई-वडिलांनी मदत केल्याचे अजित बनकर यांनी फिर्यादीत म्हटले होते. हडपसर पोलिसांनी तातडीने याप्रकरणाचा तपास करुन वृषालला अटक केली होती. या खटल्यात सरकार पक्षाकडून अतिरिक्त सरकारी वकील अ‍ॅड. विलास पठारे यांनी नऊ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्या. परिस्थितीजन्य पुरावा विचारात घेऊन न्यायालयाने आरोपी वृषाल आणि त्याचे वडील मधुकर यांना दोषी ठरवून शिक्षा सुनावली.

कारागृहात श्रम करुन दंड भरा.

आरोपी वृषाल याला ओम बनकर याचा खून केल्याप्रकरणी विशेष न्यायालयाने खून (भादंवि कलम ३०२), अपहरण (भादंवि ३६३), पुरावा नष्ट करणे (भादंवि २०१) या कलमांखाली दोषी धरून शिक्षा सुनावली आहे. विविध कलमांखाली दोषी धरलेल्या वृषालला सर्व शिक्षा एकत्रित भोगायच्या आहेत. ओम बनकर याचा खून केल्याप्रकरणी त्याच्या कुटुंबीयांना  एक लाख रुपये नुकसान भरपाईपोटी  देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दंडापोटीची रक्कम रोख स्वरुपातदेखील भरता येईल. समजा दंड भरण्यास पैसे नसतील तर कारागृहात परिश्रम करुन एक लाख रुपये जमा करा. दंडाची रक्कम नुकसानभरपाईच्या स्वरुपात ओमच्या कुटुंबीयांना देण्याचे आदेश न्यायालयाने निकालपत्रात दिले आहेत.