साडेअठरा लाखांचा ऐवज जप्त

कर्वेनगर, वारजे भागात घरफोडी करणाऱ्या चोरटय़ांना पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून घरफोडीचे अकरा गुन्हे उघडकीस आले असून चोरटय़ांकडून रोकड आणि दागिने असा १८ लाख ४४ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला.

या प्रकरणी प्रणव विकास चांदगुडे (वय १९, रा. तुषार हाइट्स, शिवणे), श्रीकांत नंदकुमार झगडे (वय २१, रा.आर्यन सोसायटी, पौड रस्ता), कमलेश संतोष मोकर (वय २९, रा. माताळवाडी, भूगाव, ता. मुळशी) यांना अटक करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांत वारजे आणि कर्वेनगर भागात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती.

चोरटय़ांना पकडण्यासाठी अतिरिक्त पोलीस आयुक्त रवींद्र सेनगांवकर, उपायुक्त बसवराज तेली यांनी पोलिसांना सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलिसांकडून तपास करण्यात येत होता. कर्वेनगर भागातून मंगळवारी (२६ ऑगस्ट) रात्री दुचाकीस्वार चांदगुडे निघाला होता. त्या वेळी गस्त घालणाऱ्या पोलिसांनी दुचाकीस्वार चांदगुडेच्या संशयास्पद हालचाली टिपल्या. पोलिसांनी त्याला थांबण्याची सूचना दिली.

चांदगुडेकडील पिशवीची तपासणी करण्यात आली. तेव्हा पिशवीत लोखंडी गज, पैंजण आणि सात हजार रुपये सापडले. पोलिसांनी त्याची चौकशी केली. तेव्हा त्याने कर्वेनगर भागात घरफोडी केल्याची कबुली दिली. तपासात त्याने कर्वेनगर, वारजे भागात घरफोडी केल्याची कबुली दिली.

चोरलेले १७ लाख ७२ हजारांचे दागिने त्याने त्याचे साथीदार मोकर आणि झगडे याला दिले होते. मोकर आणि झगडे यांच्याकडून पोलिसांनी दागिने जप्त केले. चांदगुडेकडून ३६ हजारांची रोकड जप्त करण्यात आली. वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव मोळे, गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रकाश खांडेकर, सहायक निरीक्षक बाळासाहेब शिंदे, उपनिरीक्षक सीताराम धावडे, जगन्नाथ गोरे, अमर भोसले, बालारफी शेख, संतोष देशपांडे, चंद्रकांत जाधव, सुधीर पाटील, सुभाष गुरव, विजय कांबळे, संजय दहिभाते, संदीप शेळके यांनी ही कारवाई केली.