जागेची कागदपत्रे नावावर करण्यासाठी बेकार असलेल्या मुलाने स्वत:च्या आईला बेदम मारहाण करून खून केल्याची घटना गुरुवारी एरंडवणे भागात घडली. या प्रकरणी मुलाला अलंकार पोलिसांकडून अटक केली आहे.

अरुणा मनोहर सपकाळ (वय ७०, रा. मनोहर बिल्डिंग, गणेशनगर, ओटा वसाहत, एरंडवणे) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी आनंद मनोहर सपकाळ (वय ४३) याला अटक करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक पंकज शिनगारे यांनी या संदर्भात अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुणा यांच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. एरंडवणे भागात त्यांची जागा आहे. या जागेवर बांधकाम व्यावसायिकाने सपकाळ यांना काही वर्षांपूर्वी दुमजली घर बांधून दिले. उर्वरित जागा बांधकाम व्यावसायिकाकडे आहे. अरुणा यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. दोन मुली विवाहित आहेत. मुलगा आनंद कामधंदा करत नाही. दुमजली घरातील पहिल्या मजल्यावर असलेल्या खोल्या अरुणा यांनी भाडेतत्त्वावर वापरण्यास दिल्या आहेत. जागेची कागदपत्रे नावावर करण्यासाठी आनंद त्यांना त्रास द्यायचा. गेल्या आठवडय़ापासून त्याने पुन्हा अरुणा यांना त्रास देण्यास सुरुवात केली. विवाहित बहिणींना जागेचा वाटा देऊ नको, असे त्याने सांगितले. गुरुवारी (७ डिसेंबर) पहाटे त्याने अरुणा यांना बेदम मारहाण केली.

पोलिसांकडून बनाव उघड

मुलाकडून बेदम मारहाण झाल्याने अरुणा बेशुद्ध पडल्या. त्यानंतर आनंद सकाळी अलंकार पोलीस ठाण्यात गेला. त्याच्यासोबत बहीण होती. आई झोपेतून जागी होत नाही, असे त्याने पोलिसांना सांगितले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रेखा साळुंके, गुन्हे शाखेचे निरीक्षक विजयकुमार शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. अरुणा यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच त्या मरण पावल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी अरुणा यांचा मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांकडून तातडीने तपास सुरू झाला. तपासात मिळालेल्या माहितीमुळे पोलिसांचा आनंदवरचा संशय बळावला. दरम्यान, शवविच्छेदनात अरुणा यांचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी आनंदला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केल्यावर त्याने मारहाण करून आईचा खून केल्याची कबुली दिली.

जन्मदात्याचा खून करण्याची दुसरी घटना

जन्मदात्याचा मुलाने खून करण्याची गेल्या दोन दिवसांतील दुसरी घटना आहे. बुधवारी (६ डिसेंबर) शनिवार पेठेतील पाटे हाईट्स या इमारतीतील सदनिकेत पराग क्षीरसागर (वय ३०) याने वडील प्रकाश (वय ६०) आणि आई आशा (वय ५५) यांचा खून केल्याची घटना उघडकीस आली होती. बेकार असलेला पराग दारूच्या व्यसनाचा आहारी गेला होता. त्याने पहाटे वडिलांचा गळा तीक्ष्ण शस्त्राने चिरला. त्यानंतर आईला नायलॉनच्या दोरीने गळफास दिला.