पुण्यात प्रेमाला अडसर ठरणाऱ्या आईचा मुलानेच प्रेयसीच्या मदतीने खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लोणी काळभोर पोलिसांनी मुलाला आणि त्याच्या प्रेयसीलाही बेड्या घातल्यात. धक्कादायक म्हणजे घटनेनंतर मुलाने स्वत: पोलिस ठाण्यात जात आईच्या खुनाची फिर्याद दिली होती. कर्ज घेतल्यावरुन एका व्यक्तीने खून केल्याचं त्याने पोलिसांना खोटं सांगितले. पण त्याचा जबाब घेतल्यावर त्यात पोलिसांना तफावत आढळली आणि पोलिसांनी काही तासातच हा गुन्हा उघडकीस आणला.

विशाल राम वंजारी (वय 19, रा.माने वस्ती, वढू खुर्द, तालुका- हवेली), नॅन्सी गॅब्रिअल डोंगरे (वय 26) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सुशीला राम वंजारी (वय 38,रा. माने वस्ती) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास माने वस्तीमध्ये एका महिलेचा खून झाला अशी माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी सुशीला वंजारी या मृत अवस्थेत आढळल्या. यावेळी मुलगा विशाल वंजारी हा देखील तिथे होता. त्याने नांदेडच्या एका व्यक्तीने कर्जामुळे आईचा खून केला आणि फरार झाला असे पोलिसांना सांगितले. सुरूवातीला पोलिसांना त्याचं म्हणणं खरं वाटलं, त्यानुसार त्यांनी एफआयआर देखील दाखल केला. पण पोलिसांनी केलेल्या चौकशीत तो खोटी माहिती देत असल्याचं आणि त्याच्या जबाबात तफावात असल्याचं पोलिसांना लक्षात आलं. त्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर विशालने प्रेयसीच्या मदतीने आईचा खून केल्याची कबुली दिली.

विशालने पोलिसांना सांगितलं की, नॅन्सी आणि त्याचे प्रेमसंबंध होते, पण या नात्याला आई सुशीला वंजारी यांचा विरोध होता. घरातून पैसे चोरण्यावरुन त्याची आई त्याला अनेकदा ओरडायची. सोमवारी दुपारी घरातून १५ हजार ५०० रुपये चोरल्यावरुन दोघांमध्ये मोठा वाद झाला आणि कडाक्याचे भांडण झाले. याचा राग मनात धरुन विशालने प्रेयसी नॅन्सी हिच्या मदतीने चाकूने वार करून आईचा खून केला. नंतर आईचा मृतदेह घराबाहेर आणून टाकला व खून झाल्याचा बनाव करत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्यांचा डाव आणून पाडला आणि विशाल व नॅन्सी दोघांनाही अटक केली.