भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना म्हणजे अघोषित संचारबंदीचा दिवस. भारत-पाकिस्तानच्या क्रिकेट सामन्याच्या दिवशी मित्रमंडळ कॉलनीत अगदी शुकशुकाट होता. पर्वती भागातील मित्रमंडळ कॉलनीचा परिसर म्हणजे शांत आणि फारशी वर्दळ नसलेला भाग म्हणून ओळखला जातो. प्रत्येक जण सायंकाळी क्रिकेट सामना बघण्यात दंग होता. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या गाडय़ांची वर्दळ कॉलनीत सुरू झाली. कॉलनीतील रहिवासी आणि ज्येष्ठ नागरिक हरी ढमढेरे यांच्या बंगल्यासमोर पोलिस थांबले होते. ढमढेरेंचा खून झाल्याची कुजबुज सुरू झाली आणि कॉलनीत घबराट उडाली. या घटनेला सहा वर्षे झाली आहेत. तरीही ढमढेरे यांचे मारेकरी मोकाटच आहेत आणि त्यांना पकडण्याचे आव्हान देखील पोलिसांसमोर आहे.

हरी ढमढेरे हे सेवानिवृत्त शासकीय अधिकारी. ते चौऱ्याऐंशी वर्षांचे होते. अतिशय प्रामाणिक आणि हुशार म्हणून ओळखले जाणारे ढमढेरे हे सिव्हिल इंजिनिअर होते. कोयनेचा भूकंप झाल्यानंतर धरणाची पुनर्बाधणी करण्यात ढमढेरे यांचा मोठा वाटा होता, असे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी गुलटेकडीतील डायस प्लॉट भागात गॅस एजन्सी सुरू केली होती. या व्यवसायात ढमढेरे यांनी चांगला जम बसविला होता. त्यांची मुलगी विवाहानंतर अमेरिकेत स्थायिक झाली. मुलगाही त्यांना व्यवसायात मदत करत होता. मित्रमंडळ कॉलनीत ढमढेरे यांचा दुमजली बंगला आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटचा सामना २५ मार्च २०११ रोजी होता. दिवस-रात्रीचा सामना असल्यामुळे मित्रमंडळ कॉलनीत वर्दळ नव्हती. ढमढेरे यांच्या गॅस एजन्सीतील नोकर बंगल्यात आला. त्याने व्यवसायातून जमा झालेली साडेतीन लाखांची रोकड ढमढेरे यांच्याकडे दिली. त्यांनी शेजारी असलेल्या टेबलवर रोकड ठेवण्याची सूचना त्याला केली.

नोकर तेथून निघून गेला आणि रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ढमढेरे यांचा मुलगा दिवाणखान्यात क्रिकेट सामना पाहणाऱ्या वडिलांना पाहण्यासाठी गेला. तेव्हा त्याला खुर्चीवर निपचित पडलेल्या वडिलांचा गळा चिरलेला दिसला. रक्ताचे ओघळ फरशीवर पडले होते. घाबरलेल्या मुलाने तातडीने या घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. या कॉलनीशेजारीच असलेला पर्वती दर्शन भाग संवेदनशील म्हणून ओळखला जातो. दत्तवाडी पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह गायकवाड त्या वेळी गस्त घालत होते. पोलीस नियंत्रण कक्षातून आलेली माहिती मिळताच गायकवाड यांनी तेथे धाव घेतली. पोलीस उपायुक्त राजेशकुमार मोर, सहायक आयुक्त अभय येवले यांनीही घटनास्थथळी भेट दिली आणि तपासाबाबत सूचना दिल्या.

ज्येष्ठ नागरिकाचा खून झाल्यामुळे पोलिसांनी युद्ध पातळीवर तपास सुरू केला. गुन्हा घडल्यानंतर दांडेकर पूल, पर्वती दर्शन, जनता वसाहतीतील सराइतांच्या घरी पोलीस धडकले आणि त्यांची चौकशी पोलिसांनी सुरू केली. श्वानपथकही आणण्यात आले आणि मारेकऱ्याचा माग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, गुन्हा घडल्यानंतर पहिल्या काही तासांत मारेक ऱ्यांविषयीची ठोस माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. गुन्हे शाखेच्या पथकानेही समांतर तपास सुरू केला. मात्र, त्यांनाही काही धागेदोरे मिळाले नाही. पोलिसांनी ढमढेरे यांच्या मारेक ऱ्यांना पकडण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र, पोलिसांना त्यांच्या मारेक ऱ्यांपर्यंत पोहोचता आले नाही. त्या घटनेची आठवण सांगताना विजयसिंह गायकवाड म्हणाले, की ढमढेरे यांच्या नोकराने त्यांच्या घरात ठेवलेली साडेतीन लाखांची रोकड चोरटय़ाने चोरली होती. त्यामुळे ढमढेरे यांचा खून चोरीच्या उद्देशातून झाल्याचा पोलिसांचा संशय होता. ती शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी शहरातील सराईत चोरटय़ांच्या हालचालीवर लक्ष ठेवले होते. तसेच त्या काळात कारागृहातून जामीन मिळवून बाहेर पडलेल्या चोरटय़ांची चौकशीही पोलिसांनी केली होती. ढमढेरे यांच्या खूनप्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी जवळपास दोनशे ते अडीचशे चोरटय़ांची चौकशी केली. मात्र, त्यांच्या चौकशीतून फारसे काही निष्पन्न झाले नाही. त्यानंतर ढमढेरे यांच्या खूनप्रक रणात गॅस एजन्सीतील कामगारांचीही चौकशी करण्यात आली. त्या अनुषंगाने पोलिसांचे एक पथक चौकशीसाठी कोकणातही गेले होते. संशयावरून दोघांना ताब्यात देखील घेतले होते. मात्र तरीही काही निष्पन्न झाले नाही. पुढे तांत्रिक तपासावर भर देण्यात आला होता.

चोरीची शक्यता, कौटुंबिक वाद अशा शक्यताही पडताळून पाहण्यात आल्या. मात्र, ढमढेरे यांचे कोणाशी वाद नव्हते. त्यामुळे कौटुंबिक वादाच्या शक्यतेवर तपास करण्यात फार काही अर्थ नव्हता. ढमढेरे यांच्या दिवाणखान्यातील फरशीवर चोरटय़ाच्या पायाचे ठसे उमटले होते. त्याआधारे अंगुलीमुद्रा विभागातील तज्ज्ञांची (फिंगरप्रिंट एक्सपर्ट) मदत घेण्यात आली. त्या दृष्टीने तपास झाला. पण तपास करूनही ढमढेरे यांच्या मारेक ऱ्यापर्यंत पोहोचता आले नाही, याची सल तत्कालीन अधिकाऱ्यांच्या मनात कायम आहे. गायकवाड यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी आलेले पोलीस निरीक्षक सतीश गोवेकर यांनीही या प्रकरणात लक्ष घालून खुन्यांचा माग काढण्यासाठी सर्व पातळ्यांवर सतत प्रयत्न केले. मात्र, त्यात त्यांनाही यश आले नाही.