03 December 2020

News Flash

गुंडगिरीपुढे हाताची घडी, तोंडावर बोट

शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या टोळ्या तयार झाल्या आहेत. त्यांच्यातही हाणामाऱ्यांचे प्रकार घडत असून अशा अनेक प्रसंगांमध्ये शिक्षकांची अवस्था हाताची घडी तोंडावर बोट अशी होत आहे.

(संग्रहित छायाचित्र)

महाविद्यालयांमध्ये चालणाऱ्या हाणामाऱ्या, गुंडगिरी आणि गैरप्रकारांचे लोण शाळांपर्यंत पोहोचले असून शाळांमधील विद्यार्थ्यांमध्येही गुंडगिरी वाढत असल्याचे चित्र शहरात दिसत आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या टोळ्या तयार झाल्या आहेत. त्यांच्यातही हाणामाऱ्यांचे प्रकार घडत असून अशा अनेक प्रसंगांमध्ये शिक्षकांची अवस्था हाताची घडी तोंडावर बोट अशी होत आहे. तास बुडवून शाळेबाहेर भटकणे, शाळेजवळच्या व्हिडिओ पार्लरमध्ये व्हिडिओ गेम खेळत बसणे, टिंगल टवाळी, हाणामाऱ्या असे अनेक प्रकार शालेय विद्यार्थ्यांकडून सातत्याने घडतात.

शाळांमधील विद्यार्थ्यांचे वर्तन ही अनेक शिक्षकांपुढील समस्या असून त्याबाबत शिक्षकांमध्येही सातत्याने चर्चा होते. मात्र त्यावर अद्याप तरी ठोस काही कार्यवाही झालेली नाही. वृत्तपत्र आणि दूरचित्रवाणी माध्यमांद्वारे होत असलेला नकारात्मक गोष्टींचा भडिमार, कायद्याच्या कचाटय़ात सापडू नये म्हणून शिक्षा न करण्याची शिक्षकांची अलिप्त वृत्ती, मुलगा कसाही वागला तरी तो आठव्या इयत्तेपर्यंत वरच्या वर्गात जाणारच असल्यामुळे आलेली बेफिकिरी वृत्ती, विभक्त कुटुंब पद्धती आणि नोकरीमुळे व्यग्र असल्याने पालकत्वाच्या भूमिकेचा विसर पडलेले आई-बाबा अशा विविध कारणांमुळे सध्याची मुले बेशिस्त नव्हे तर ती अस्थिर झाली आहेत, या पाश्र्वभूमीवर ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. अ. ल. देशमुख यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी या विविध कारणांकडे लक्ष वेधले.

डॉ. देशमुख म्हणाले, सामाजिक प्रक्रियेचा परिणाम या स्वरूपात शालेय विद्यार्थ्यांमध्ये अस्थिरता आली आहे. समाजामध्ये वाढत असलेली गुंडगिरी, अत्याचार, चोऱ्या, दरोडा, भ्रष्टाचार या साऱ्या गोष्टी मुलांना समजतात. त्यांच्यावर नकारात्मक गोष्टींचा भडिमार होत आहे. त्यातून आपणही असे काही करावेसे त्यांना वाटते. शाळेतील शिक्षेचे स्वरूप बदलले आहे. शिक्षकाने मारणं तर दूरच पण, साधं रागावलेलंही पालकांना चालत नाही. त्यामुळे शिक्षक अलिप्त राहिले आहेत. कायद्याच्या कचाटय़ात अडकण्यापेक्षा शांत राहणे पसंत करताना दिसून  येत आहेत.

कसाही वागला तरी पहिलीत आलेला मुलगा आठवीपर्यंत वरच्या वर्गात जाणारच आहे. त्यामुळे आपले वर्तन आणि अभ्यास याविषयी विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना फिकीर राहिलेली नाही. पाचवीतील मुलगा त्याच्याच वर्गातील मुलीला पत्र देणे आणि मुलीने मुलाला पत्र देणे असे प्रकार घडताना दिसून येत आहेत. या सगळ्यामध्ये मुलांपेक्षा मुलींचे वर्तन अधिक खराब असल्याचे निरीक्षक अनेक शिक्षक मित्रांनी नोंदविले आहे.

मुलांचे वागणे हे घरच्यांवर अवलंबून असते. मुलाला हवे ते आणून देणे म्हणजे पालकाची जबाबदारी संपली असे होत नाही. तर, मुलांवर चांगले संस्कार करणे ही पालकत्वाची जबाबदारी सध्याचे आई-बाबा विसरले आहेत. या साऱ्या गोष्टींचा परिणाम म्हणून मुले बेशिस्त नव्हे तर अस्थिर झाली आहेत.

‘सॉफ्ट कॉर्नर’ म्हणून मुलांच्या वर्तनाविषयी कोणी बोलत नाही. आपल्या शिक्षण प्रक्रियेमध्ये शिस्तीला महत्त्व नाही. केवळ मुलांना मारणं म्हणजे शिस्त लावणं हा गैरसमज आहे. शिक्षक सत्प्रवृत्तीने वागला तरी मुलांमध्ये शिस्त निर्माण होते. अशा स्वरूपाचे प्रशिक्षण आपल्या शिक्षक प्रशिक्षणामध्ये नाही. प्रत्येक शिक्षक हा चांगला समुपदेशक होऊ शकतो. मुले जितका वेळ शाळेत असतात त्याहून अधिक काळ ती घरामध्ये असतात. मात्र, सध्याच्या काळात दोघेही नोकरीमध्ये व्यग्र असल्याने मुलांच्या शिक्षणाकडे आणि त्यांच्या वर्तनाकडे पाहण्यासाठी आई-बाबांकडे वेळ उरलेला नाही.

डॉ. अ. ल. देशमुख, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2018 5:02 am

Web Title: pune crimecrime issue
Next Stories
1 ‘पोलीस काका’ उपक्रमामुळे गैरप्रकारांना आळा 
2 ‘स्मार्ट सिटी’ कार्यालय विद्यापीठात
3 पिंपरीत गावठी कट्टय़ांचा सुळसुळाट
Just Now!
X