16 November 2019

News Flash

सायकल योजना गुंडाळणार?

तीन कंपन्यांची माघार, एकाच कंपनीकडून सेवा

तीन कंपन्यांची माघार, एकाच कंपनीकडून सेवा

शहरात राबविण्यात येत असलेल्या भाडे तत्त्वावरील सायकल योजनेतील सायकलची होत असलेली मोडतोड आणि गैरवापर, वापरण्यासाठीच्या शुल्कात करण्यात आलेली वाढ यामुळे वापकरर्त्यांनी योजनेकडे पाठ फिरवली असून या योजनेसाठी आवश्यक पायाभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे अल्पावधीत लोकप्रिय झालेली सायकल योजना गुंडाळली जाण्याची भीती निर्माण झाली आहे. योजनेअंतर्गत सायकल पुरविणाऱ्या तीन कंपन्यांनी सायकल उपलब्ध करून देण्यास असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे शहरात केवळ एकाच कंपनीच्या सायकलवर ही योजना सुरू असल्याचे चित्र आहे.

शहरात स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत दीड वर्षांपूर्वी मोठय़ा उत्साहात भाडे तत्त्वावरील सायकल योजना सुरू करण्यात आली. महापालिका आणि स्मार्ट सिटी प्रशासनाचा हा संयुक्त उपक्रम होता. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि औंध येथे प्रायोगिक तत्त्वावर ही योजना सुरू करण्यात आल्यानंतर अल्पावधीतच ती लोकप्रिय झाली आणि शहाराच्या अन्य भागात ती राबविण्यास सुरुवात झाली. झूमकार-पेडल, मोबाइक, ओफो आदी कंपन्यांनी योजनेला प्रतिसाद देत हजारोंच्या संख्येने सायकली उपलब्ध करून दिल्या. मात्र सध्या झूमकार-पेडल, ओफोनंतर मोबाइक या कंपन्यांकडून या योजनेतून माघार घेण्यात आली आहे. केवळ युलू या कंपनीकडूनच सायकलचा पुरवठा होत आहे. त्यामुळे योजना गुंडाळली जाण्याची भीती आहे.

योजनेचा टप्प्याटप्प्याने विस्तार केल्यानंतर सायकलींचा गैरवापर होत असल्याचे अनेक प्रकार पुढे आले. सायकलची मोडतोड करणे, सायकलला बसविण्यात आलेली जीपीआरएस यंत्रणा काढून टाकणे, सायकल नदीपात्रात फेकून देणे अशा प्रकारांमुळे ओफो आणि पेडल या कंपनीने एकूण चार हजार सायकली परत घेतल्या होत्या. त्यानंतर मोबाइक या कंपनीनेही या योजनेतून माघार घेण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे सायकल योजनेअंतर्गत सायकल उपलब्ध करून देणारी युलू ही एकमेव कंपनी राहिली आहे.

सायकल योजना गुंडाळली जाण्याची भीती

शहरातील खासगी वाहनांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन महापालिकेने सायकल वापरण्यास प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी एकात्मिक सायकल योजनेचा आराखडा तयार करण्यात आला. शहरात एकात्मिक सायकल आराखडा योजनेनुसार एकूण ८२४ किलोमीटर लांबीचे सायकल मार्ग प्रस्तावित आहेत. त्यापैकी पथ विभागामार्फत २६ किलोमीटरचे मार्ग तयार करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

सायकलच्या गैरवापराबरोबरच पायाभूत सुविधांचा अभाव हे एक कारणही कंपन्यांनी माघार घेण्यामागे आहे. जंगली महाराज रस्ता, फग्र्युसन महाविद्यालय रस्ता, एमआयटी, शिवाजीनगर, कोथरूड, विधी महाविद्यालय रस्ता, सिंहगड रस्ता, नांदेड सिटी, कर्वेनगर, बी. टी. कवडे रस्ता, अ‍ॅमनोरा पार्क येथे ही सेवा सुरू करण्यात आली होती.

सायकलची संख्या वाढविण्याचे प्रयत्न

मोबाइक कंपनी सायकल योजनेतून माघार घेण्यात येणार असल्याच्या वृत्ताला महापालिकेकडून दुजोरा देण्यात आला. सायकल योजनेचे प्रमुख नरेंद्र साळुंखे यासंदर्भात बोलताना म्हणाले की, महापालिकेबरोबर झालेल्या बैठकीवेळी कंपनीच्या प्रतिनिधींकडून योजनेतून माघार घेणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र तसे लेखी कळविण्यात आलेले नाही. ही कंपनी सर्वच ठिकाणची सेवा बंद करणार आहे. आर्थिकदृष्टय़ा सायकल योजना कंपनीला परवडत नसल्याचे दिसून येत आहे. गैरप्रकारांना सध्या आळा बसला आहे. सायकलची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.

First Published on June 20, 2019 10:08 am

Web Title: pune cycle plan